कल्याण – घरगुती गॅस सिलिंडर मधून गॅस गळती होऊन घरात स्फोट होऊन गंभीररित्या भाजलेल्या येथील मनसेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शीतल विखणकर यांच्यावर नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. ऐशी टक्के भाजलेल्या शीतल यांचे गुरूवारी उपचार सुरू असताना निधन झाले.
हेही वाचा >>> माळशेजमधील काचेचा पूल मार्गी लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय
खडकपाडा येथील राहत्या घरात गेल्या शुक्रवारी दुपारच्या वेळेत भोजन करत असताना सिलिंडरमधून गॅस बाहेर येऊन झालेल्या स्फोटात शीतल विखणकर ८० टक्के भाजल्या होत्या. त्यांना प्रथम कोन येथील वेद रूग्णालय, त्यानंतर नवी मुंबईतील बर्न रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून शीतल यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलीस तपासात आता नवीन पुढे आली आहे. शीतल या भिवंडी जवळील कोन येथील एका घरात भाजल्या होत्या. यावेळी त्यांचा वाहन चालक अविनाश पाटील तेथे उपस्थित होता. त्याने शीतल यांना वेद रूग्णालयात दाखल केले असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे शीतल या खडकपाडा येथील घरात की कोन येथील घरात भाजल्या असा नवीन प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. खडकपाडा पोलिसांनी हे प्रकरण अधिकच्या तपासासाठी कोन पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी वर्ग केले.