डोंबिवली – शासकीय कार्यालये, आस्थापना, सार्वजनिक फलकांवर मराठीचा प्राधान्याने वापर झालाच पाहिजे, या मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे मनसैनिकांनी जेथे जेथे मराठीचा वापर होत नसेल तेथे मनसे पध्दतीने आक्रमक भूमिका घेत मराठीचा प्राधान्याने वापर करण्याच्या सूचना सर्वसंबंधितांना करण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी मनसेच्या डोंबिवली जवळील २७ गाव भागातील कार्यकर्त्यांनी शिळफाटा भागात एमएमआरडीएने लावलेल्या हिंदी भाषिक सूचनांना काळे फासले. याठिकाणी मराठीचा प्राधान्याने वापर झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा वापरासंबंधीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलनाचे यापूर्वी स्वागत करून योग्य ठिकाणी आपला संदेश गेला आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत बँका, आस्थापनांमध्ये जाऊन मराठीच्या वापराचा आग्रह बँक अधिकाऱ्यांना धरला होता. त्यामुळे अधिकारी, कार्यकर्ते यांच्या शाब्दिक बाचाबाची, मारहाणीचे प्रकार सुरू झाले होते. अशाप्रकारे कायदा हातात कुणी घेऊ नये, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मनसेने त्यानंतर मवाळ भूमिका घेतली होती.

शिळफाटा रस्त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो कंपनीच्या साहाय्याने कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग उभारणीची कामे सुरू आहेत. या मेट्रो मार्गाच्या ठिकाणी वाहन चालक, प्रवाशांना सूचना देणारे अनेक सूचना फलक हिंदी भाषेतून शिळफाटा रस्त्यावर लावण्यात आले आहेत. एमएमआरडीए ही महाराष्ट्राचा शासनाचा एक महत्वाचा भाग आहे. मराठी भाषेचा प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात प्रभावी वापर झाला पाहिजे, अशा शासनाच्या सूचना आहेत. अशा परिस्थितीत एमएमआरडीएने शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्ग उभारणी कामाच्या ठिकाणी हिंदी, इंग्रजी भाषेतून फलक लिहून मराठी भाषा दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

शासनाचे एक महत्वाचे अंग असलेल्या एमएमआरडीएने शिळफाटा रस्त्यावर मेट्रो कामासह, इतर सूचना फलक मराठी भाषेतून लिहावेत, या मागणीसाठी मनसेच्या २७ गाव भागातील मनसैनिकांनी बुधवारी जथ्थ्याने येऊन शिळफाटा रस्त्यावरील फलकांवर मराठीचा प्रभावी वापर झालाच पाहिजे, अशा घोषणा देत शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्गिका कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या हिंदी भाषिक सूचना फलकांना काळे फासले. या रस्त्यावरील सूचना फलक मराठीतून लावण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे केली.