डहाणूतून ११ वर्षीय दियाचे बंगल्यातून अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. कुणी माथेफिरू विकृत व्यक्तीने तिच्यावर अत्याचार करून तिच्या जिवाचे बरेवाईट करण्याची शक्यता होती. पालघर पोलिसांनी रातोरात ७० पोलिसांचे पथक लावून शोध सुरू केला. काहीच सुगावा नव्हता. तेव्हा पोलिसांना एका आवाजाचा संदर्भ लागला आणि आवाजावरून तर्क लावत पोलिसांनी दियाच्या अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला.
२० जुलै २०१६. भल्या पहाटे डहाणूतील मसोली गावात राहणाऱ्या नाहर कुटुंबीयांवर आभाळ कोसळले होते. त्यांच्या ११ वर्षांच्या रियाचे अपहरण झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास बंगल्यातून रियाला कुणी तरी पळवून नेले होते. आजूबाजूला शोधाशोध केल्यानंतर नाहर कुटुंबीयांनी पहाटे सहा वाजता डहाणू पोलीस ठाणे गाठले होते. एका उच्चभ्रू घरातील मुलीचे अपहरण झाल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
पालघरच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी पुढचे संकट ओळखले. पाथर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या झाल्याने सारे राज्य हादरले होते. त्यात पुन्हा एका मुलीचे अपहरण झाले होते. त्यांनी त्वरित ७० पोलिसांचा समावेश असलेले सात पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. सचिन नाहर हे प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांचा निर्यातीचा व्यवसाय होता. डहाणूत त्यांचा टुमदार बंगला होता. नाहर दाम्पत्य एका खोलीत झोपायचे तर ११ वर्षांची दिया लहान सात वर्षांच्या भावासह दुसऱ्या खोलीत झोपायची. पोलिसांनी विविध तर्क लावून तपास करायला सुरुवात केली. अपहरणकर्ता स्वयंपाकघरातील खिडकीच्या गज वाकवून आले होते आणि त्याच मार्गाने दियाला उचलून नेले होते. ज्या अर्थी अपहरणकर्ता सहज घरात शिरला होता ते पाहता त्याला घरातील सर्व खाचखळगे माहीत असले पाहिजेत. मग असा माणूस कोण असावा? पोलिसांनी तर्क लावला. घरातील नोकर..? पोलिसांनी लगेच सर्व नोकरांना उभे केले. बंगल्यातील नोकर, चालक, माळी, स्वयंपाकी.. सर्वाची चौकशी सुरू झाली पण काहीच थांगपत्ता लागत नव्हता. बंगल्यात नियमित येणारे लोक, जवळचे मित्रपरिवार, व्यावसायिक शत्रुत्व सगळे वेगाने तपासण्यात येऊ लागले. पोलिसांचा तपास सुरू असताना दियाच्या आईचा मोबाइल वाजला. पोलिसांना अशा कॉलची अपेक्षा होतीच. तो कॉल अपहरणकर्त्यां व्यक्तीचा होता, त्याने दियाच्याच मोबाइलने कॉल केला होता.
दिया जिवंत हवी असेल तर पाच कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल.. नंतर फोन करतो, असे सांगून त्याने फोन कट केला. अपहरणकर्त्यांला काहीही करून पकडायचा पोलिसांनी चंग बांधला. हाती काही सुगावा नव्हता. त्यामुळे अपहरणकर्त्यांच्या आवाजावरून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांनी निश्चय केला. कारण ज्या प्रकारे दियाचे अपहरण झाले होते ते पाहता परिचित व्यक्तीचेचे हे काम असले पाहिजे, या निष्कर्षांवर पोलीस ठाम होते.
जो फोन आला होता, तो दियाच्या मोबाइलवरूनच आला होता. या मोबाइलमध्ये दिया अलार्म लावून ठेवायची. अपहरणर्त्यांचा आवाज ओळखणे गरजेचे होते. दियाच्या आईच्या मोबाइलमध्ये कॉल रेकॉर्डर नव्हते. पोलिसांनी लगेचच कॉल रेकॉर्डिग करणारे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केले. पुढच्या वेळी फोन आला तर जास्तीत जास्त वेळ बोलत राहिले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दियाच्या आईला दिल्या. कोवळय़ा मुलीचे अपहरण झाल्याने ती रडून रडून बेजार झाली होती. घरात दु:ख आणि संतापाचे वातावरण होते. पोलिसांनी त्या कॉलचे टॉवर लोकेशन काढले. पण ते मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ होते. अपहरणकर्ता हुशार होता. त्यामुळे त्याने पोलीस पोहोचू नयेत याची खबरदारी घेतली होती.
पोलीस पुढच्या फोनची वाट पाहू लागले. अपहरणकर्ता थंडपणे बोलत होता. त्याने जास्त वेळ बोलत राहावे म्हणून दियाच्या आईला पोलिासांनी पाच कोटींच्या रकमेत तडजोड करायला सांगितली. त्यानुसार दियाची आई बोलत होती. ‘तुम्हारी दिया बहोत क्यूट है.. उसकी स्माइल बहोत क्यूट है. उसकी जान बचानी है तो पैसे का बंदोबस्त करो,’ असे त्याने सांगितले.
पोलिसांनी आवाज घरातील सगळ्यांना ऐकवला. पण कुणालाच तो ओळखता येत नव्हता. कदाचित अपहरणकर्ता आवाज बदलून बोलत असावा. नाइलाज होता, परंतु पोलीस दियाच्या आईला पुन:पुन्हा आवाज ऐकवत होते. पोलीसही सतत तो आवाज ऐकत होते. एवढय़ात ती दचकून म्हणाली,
‘दिया बहोत क्यूट है’ हे वाक्य शिवाच बोलायचा!
पोलिसांना लगेच आशेचा किरण दिसला. त्यांनी चौकशीस सुरुवात केली. शिवा हा दियाच्या कुटुंबात स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. पाच वर्षांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पण शिवाला शोधायचे कसे, हा प्रश्न होताच. शिवावर थेट झडप घालणे, दियाच्या दृष्टीने धोक्याचे होते. मग पोलिसांनी शिवाचा मोबाइल क्रमांक मिळवला आणि जेवण बनवण्याची ऑर्डर द्यायचीय, असे सांगत त्याला फोन लावला. पण ‘मी मुंबईत आहे, आज येऊ शकणार नाही’ असे सांगत शिवाने फोन ठेवून दिला. परंतु, तेवढय़ा वेळात पोलिसांना त्याच्या कॉलचे लोकेशन मिळाले होते. ते पालघरचे होते. त्यामुळे शिवा खोटे बोलत होता, हे उघड झाले. पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी आता त्याला पकडायचेच यावर लक्ष केंद्रित केले. इकडे नाहर कुटुंबीयांकडून पैसे येत नसल्याने शिवाही बैचेन झाला होता. तो बिथरला. त्याने सिम कार्ड तोडून टाकले. त्याच्याकडे दियाच्या घरातील कुणाचेच नंबर नव्हते. आपली योजना असफल होत असल्याचे त्याला जाणवले. दियाला संपवून पळून जाण्याची त्याने योजना बनवली, परंतु तेवढय़ात त्याच्या मोबाइलच्या लोकेशनवरून पोलिसांनी त्याच्या घराचा पत्ता शोधला आणि ते शिवाच्या घरात धडकले. एका निर्जन जागेतील गोदामात त्याने दियाला लपवून ठेवले होते. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दियाची सुटका केली.
शिवा हा मूळचा बिहारमधील रहिवासी होता. तो नाहर कुटुंबीयांकडे तब्बल दहा वर्षांपासून काम करीत होता. त्यामुळे घरातील एक सदस्यच बनला होता. नाहर कुटुंबीय दियावर खूप प्रेम करायचे. तो नेहमी दियाच्या आईला एक वाक्य म्हणायला, आपकी दिया बहोत क्यूट है.. वारंवार तो हे पठडीतले वाक्य म्हणत असायचा. २०१० मध्ये त्याने गावातील एका स्थानिक मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. मोठा वाद निर्माण झाला होता. त्या घटनेनंतर नाहर कुटुंबीयांनी शिवाला कामावरून काढून टाकले होते. गेल्या सहा वर्षांपासून त्याचा नाहर कुटुंबीयांशी काही संबंध नव्हता. परंतु त्याला घराची खडान्खडा माहिती होती. त्यातूनच त्याने दियाच्या अपहरणाचा कट रचला. त्याला या कामात साथ देणारे आनंद भगत (३५) कृष्ण कुमार राम आतीश (१९) आणि पिंकी तांडेल (२४) या सर्वाना पोलिसांनी अटक केली. पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस आदींच्या संयुक्त पथकाने अवघ्या १२ तासांतच दियाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले.

Story img Loader