राबोडी भागात पादचाऱ्याचा मोबाईल चोरी करून दुचाकीवरून पळ काढणाऱ्यांपैकी एक आरोपी दुचाकीवरून खाली पडला आणि त्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरट्याच्या सखोल चौकशीत पोलिसांनी त्याच्या आणखी तीन साथिदारांना ताब्यात घेऊन अटक केली. या चोरट्यांनी आतापर्यंत नागरिकांचे २० महागडे फोन चोरी केल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पवन गौंड (२२), विकास राजभर (२२), संजय राजभर (२०) आणि क्रिशकुमार गौंड (२२) अशी अटेकत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून २० महागडे मोबाईल आणि तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. माजीवडा भागात राहणारे ३५ वर्षीय व्यक्ती हे कामानिमित्ताने राबोडी भागातून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या हातात मोबाईल होता. हा मोबाईल दुचाकीवर आलेल्या तिघांनी खेचून नेला. दरम्यान, चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढत असताना त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले. त्यावेळी तिघांपैकी एक चोरटा हा दुचाकीवरून खाली पडला. तर इतर दोन चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
स्थानिक नागरिकांनी त्या चोरट्याला पकडून राबोडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव पवन असल्याचे सांगितले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याच्या आणखी तीन सहकाऱ्यांची नावे समोर आली. त्यानुसार राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या पथकाने विकास, संजय आणि क्रिशकुमार यांनाही ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी या चौघांकडून २० महागडे मोबाईल, तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.