डोंबिवली – कोपर रेल्वे स्थानकात एका प्रवासी महिलेचा हातातून फलाटावर पडलेला मोबाईल उचलून एका भामट्याने पळ काढला. या महिलेने चोर म्हणून ओरडा सुरू केला. कोपर रेल्वे स्थानक मास्तर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि इतर प्रवाशांनी भामट्चा पाठलाग करून त्याला कोपर गावाजवळ पकडले. चित्रपटातील थराराप्रमाणे हा प्रकार सोमवारी दुपारी घडला.दिवा-वसई शटल सेवेने मारिया घोष ही महिला कोपर अप्पर रेल्वे स्थानकात उतरली होती. ही महिला खालच्या कोपर स्थानकात येऊन तेथून कोपर भागात पायी चालली होती. फलाटापासून काही अंतरावर या महिलेचा मोबाईल जमिनीवर पडला. त्याचवेळी या महिलेच्या मोबाईलवर पाळत ठेऊन या महिलेचा पाठलाग करत असलेल्या एका भुरट्या चोराने तो उचलून पळ काढला.
मारिया यांनी त्या भुरट्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तो पळू लागल्यावर मारिया यांनी चोर म्हणून ओरडा केला. कोपर स्थानक मास्तर भूषण घाणे यांच्या हा प्रकार लक्षात येताच घाणे यांच्यासह त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी भुरट्या चोराचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी राकेश पार्टे, साक्षी मोरे या पादचाऱ्यांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. याप्रकरणी त्याला पकडून कोपर रेल्वे स्थानकात आणले. त्याला तेथून डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार पांडुरंग जाधव यांच्या ताब्यात देण्यात आले. जाधववर महिलेच्या तक्रारीवरून डोंंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.