कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोन सराईत मोबाईल चोरांना अटक केली आहे. ते उल्हासनगर येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून ९३ हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
विवेक आत्माराम पाटील उर्फ भावड्या (२२), इरफान खाजा हुसेन सय्यद (३०) अशी आरोपींची नावे आहेत. मागील वर्षभरापासून कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांकडील मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रवासी लोकल, एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना अचानक त्याच्या खिशातील, हातामधील, पिशवीमधील मोबाईल चोरांकडून लंपास केला जात होता. प्रवाशाची प्रवासाला सुरुवात झाली की मग त्याला मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येते होते. अशाप्रकारचे चोरी करणारे अनेक भुरटे चोर पोलिसांनी यापूर्वी अटक केले आहेत.
अशाप्रकारे मोबाईल चोरणारी मोठी साखळी असल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्याण लोहमार्ग पोलिसांचे एक पथक बुधवारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत होते. त्यांना रेल्वे स्थानक परिसरात दोन तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळले. पोलिसांनी दोन्ही तरुणांना थांबवून त्यांची चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय वाढल्याने त्यांनी विवेक, इरफान यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी सुरू करताच त्यांनी आपण रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरत होतो अशी कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ९३ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त केले. या दोघांनी आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.