कल्याण – कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ग्रामीण, दुर्गम भागातील खेडेगावात राहत असलेल्या नागरिकांच्या घराच्या दारात जाऊन कर्करोगविषयक तपासणी करता यावी. कर्करोगविषयक जनजागृती करावी, .या उद्देशातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहापूर तालुक्यात कर्करोग जनजागृती वाहन दाखल झाले आहे. हे वाहन स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक गाव, आदिवासी पाड्यावर नेऊन कर्करोगविषयक जनजागृती, तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावांमधील अनेक नागरिकांना तंबाखू सेवन, तंबाखुची मशिरी, विडी सेवन करण्याचे व्यसन असते. या माध्यमातून होणाऱ्या दुष्परिणामांची अनेकांना माहिती नसते. या वस्तू सेवन करणाऱ्यांना नागरिकांना अनेक वेळा मुख कर्करोग होतो. काही महिलांना स्तनाच्या कर्करोगाची बाधा असते. पण त्याकडे दुर्लक्ष करतात.

आर्थिक चणचण, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणाऱ्या अडचणी, यामुळे खेड्यातील नागरिक अंगावर आपले दुखणे काढतो. आपला आजार गंभीर दुखणे आहे हे त्यांना अनेक वेळा माहिती नसते. त्यामुळे प्राथमिक अवस्थेत अशा नागरिकांना आपल्याला होत असलेल्या दुखण्याची, ते दुखणे कसले आहे याची माहिती असावी या विषयी जनजागृती करण्यासाठी कर्करोग जनजागृती वाहन तालुक्यात फिरविण्यात येणार आहे.

हे वाहन ज्या गावात येणार असेल त्याच्या तीन दिवस अगोदर स्थानिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी सेविका या वाहनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आपली आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन करणार आहेत. ३० वर्षापुढील वयोगटातील नागरिकांची यावेळी तपासणी केली जाणार आहे. गावातील महिला, पुरूषांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीचा अहवाल ग्रामस्थांना आठ दिवसात दिला जाईल. तपासणीत काही संशयास्पद आढळून आले तर त्या नागरिकाला पुढील तपासण्या आणि उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

गावातील प्रत्येक नागरिकाने गावात येणाऱ्या या फिरत्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. हे वाहन वातानुकूलित आहे. या वाहनात सार्वजनिक आरोग्य विभागातील स्त्रीरोग तज्ज्ञ, दंत चिकित्सक असणार आहेत. अद्ययावत वैद्यकीय तपासणी सामुग्री या वाहनात आहे. कर्करोग प्रतिबंध उपाययोजनेचा भाग म्हणून आरोग्य विभागातर्फे हा कर्करोग जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वाहन सेवा देणार आहे. गावातील कर्करोगाचे लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची या वाहनातील तज्ज्ञ डाॅक्टरांच्या माध्यमातून तपासणी केली जाईल. स्तन, मुखाची कर्करोगाची लक्षणे आढळणाऱ्यांची प्राधान्याने तपासणी केली जाईल.

संशयास्पद नागरिकांनाही यावेळी मार्गदर्शन आणि तपासणी केली जाणार आहे. महिलांमधील कर्करोगाचे निदान करण्यासाठी व्हीआयए चाचणी केली जाणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे, तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, शहापूर.