महापालिका मुख्यालयाच्या इमारतीत गुरुवारी दुपारी अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा येऊन धडकला. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना बाहेर काढून पोलिसांनी इमारतीचा ताबा घेतला. परिसरातील रस्तेही वाहतुकीसाठी बंद केले. मुख्यालयात अतिरेकी शिरल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि मुख्यालयासमोर मोठी गर्दी झाली. सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी मॉकड्रिल सुरू असल्याचे कळताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
ठाणे येथील पाचपाखाडी भागात महापालिका मुख्यालयाची इमारत आहे. या इमारतीमध्ये नेहमीच नागरिक, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ असते. लोकसभा निवडणुकीच्या कामात महापालिका अधिकारी-कर्मचारी सध्या व्यग्र झाल्यामुळे कामानिमित्त मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. गुरुवारी दुपारी साडेअकरा वाजता अचानक मुख्यालयात पोलिसांचा मोठा फौजफाटा शिरला आणि त्यांनी सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर काढले. त्याचबरोबर कचराळी तलाव परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करून या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली. ठाणे पोलिसांनी मुख्यालय इमारतीचा ताबा घेतला होता आणि विशेष पथकातील कमांडो पाचारण केले होते. त्यामुळे मुख्यालयात अतिरेकी शिरल्याची चर्चा सुरू झाली आणि क्षणांतच ही बातमी संपूर्ण शहरभर पसरली. अनेकांनी मुख्यालय इमारतीबाहेर गर्दी केली. अखेर मुख्यालयाच्या सुरक्षेची चाचपणी करण्यासाठी मॉकड्रिल सुरू असल्याचे कळताच नागरिकांची गर्दी ओसरली.
अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना
ठाणे महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी ठाणे पोलिसांनी गुरुवारी दुपारी मॉकड्रिल केले. मात्र, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याची माहिती आधीच देण्यात आल्यामुळे मॉकड्रिलचे गांभीर्य काहीसे कमी झाले. अधिकारी-कर्मचारी हसतमुखाने इमारतीबाहेर पडताना दिसत होते. दोन ते अडीच तास मॉकड्रिल सुरू होते. या कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आल्याने ते इमारतीच्या परिसरात ताटकळत उभे होते.