महापालिका क्षेत्रात बुधवारी दोन ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, पोलीस आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने मॉकड्रील केली. पावसाचे पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्याठिकाणी मदत तसेच बचावकार्य करण्यासाठी सर्वच यंत्रणा सक्षम आहेत की नाहीत, याची चाचपणी यावेळी करण्यात आली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सखल भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. अतिवृष्टी झाल्यास काही सखल भागांमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचते. यामुळे परिसरातील गृहसंकुलांमधील नागरिकांचा मार्गच बंद होतो. काही ठिकाणी चाळींमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करावे लागते. त्यामध्ये वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, साकेत (खाडी किनारी लगतचा परिसर), दिवा येथील खर्डीगाव, साबेगाव आणि देसाई नाका येथील रिव्हरवूड पार्क या सखल भागांचा समावेश आहे.
या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली तर तत्काळ मदत व बचावकार्य करता यावे यासाठी भारतीय सेनेच्या कलिना कॅम्पमधील नायब सुभेदार संजीव एस यांच्यासह तीन सुभेदारांनी मंगळवारी शहराचा पाहाणी दौरा करून सखल भागांची माहिती घेतली. त्यापाठोपाठ पालिका प्रशासनाने बुधवारी दोन ठिकाणी मॉकड्रील घेऊन पुरपरिस्थितीच्या काळात मदत तसेच बचावकार्य करण्यासाठी सर्वच यंत्रणा सक्षम आहेत की नाहीत, याची चाचपणी केली.
घोडबंदर येथील कासारवडवली भागातील डी-मार्ट जवळील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची वर्दी यंत्रणांना देण्यात आली होती. तर, राबोडी येथील आनंद पार्क येथे मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने जवळच असलेला नाला तुडूंब भरुन त्यातील पाणी आसपासच्या सोसायटीमध्ये शिरले असून त्या सोसायटीमधील ३० ते ४० रहिवाशी अडकल्याची वर्दी यंत्रणांना देण्यात आली होती. वर्दी मिळताच या दोन्ही ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान काही वेळेतच पोहचले. दोन्ही मॉकड्रील यशस्वीपणे पुर्ण करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.