एक वेळ गावठी दारूच्या अड्डय़ांवर कारवाई करणे पोलिसांना सोपे आहे, परंतु ही गावठी दारू जिथे बनते, त्या भट्टय़ा उद्ध्वस्त करणे म्हणजे फारच जिकिरीचे काम, परंतु या आव्हानाचाही भाईंदर पोलिसांनी यशस्वीपणे मुकाबला केला. आधी गुगल मॅप आणि नंतर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून पोलिसांना आता दारूच्या भट्टय़ांविरोधात हल्लाबोल सुरू केला आहे.
भाईंदरजवळील मुर्धा, राई, मोर्वा या गावांलगत असलेल्या दाट जंगलात आजही गावठी दारूच्या भट्टय़ा लावल्या जातात. भट्टय़ांसाठी लाकडांचा वापर केला तर त्या दूरवरूनही नजरेत येतात. यासाठी भट्टीचालक आता गॅसचा वापर करू लागले आहेत. गावठी दारूच्या भट्टय़ांचे कंबरडेच मोडायचा निर्णय ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी घेतला आणि सुरू झाली भट्टय़ांची शोधमोहीम. आधी निव्वळ ऐकीव माहिती अथवा खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे भट्टय़ांचा शोध घेण्यात येऊ लागला, परंतु यात पोलिसांना प्रचंड त्रास होऊ लागला. दाट जंगलात शोध घेणे म्हणजे गवतात सुई शोधण्याइतके कठीण. यावर उपाय म्हणून भाईंदर पोलिसांनी गुगल मॅपच्या आधारे भट्टय़ांच्या ठिकाणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यात चांगलेच यश मिळाले आणि ही पद्धत पोलीस दलातही लोकप्रिय ठरली. महेश पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.मंगळवारी अशीच शोध मोहिमेवर चर्चा सुरू असतानाच महेश पाटील यांनी ड्रोन कॅमेराचा वापर करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.
भिवंडी येथे भट्टय़ांचा शोध घेण्यासाठी त्याचा यशस्वी वापर झाला होता. मग लगेचच चक्रे हलली. महेश पाटील यांनी बुधवारी मोहीम आखण्याचे आदेश दिले. त्यानुसार भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हाताखालच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. खबऱ्यांचे जाळे चाचपण्यास सुरुवात झाली. बुधवारी मोहीम कशी आणि कुठे राबवायची याचे नियोजन करण्यात आले. भट्टय़ा कुठे सापडतील याची खबऱ्यांकडून माहिती काढण्यात आली आणि रात्री उशिरा मोहिमेचे नियोजन पूर्ण झाले.बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी पोलीस ठाण्यात हजर झाले. पाठोपाठ ड्रोन कॅमेऱ्याचे पथकही दाखल झाले. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर कसा होतो याचे आधी प्रात्यक्षिक पाहण्यात आले. मोहिमेची पुन्हा एकदा उजळणी करण्यात आली आणि मग पोलिसांचे पथक भट्टय़ांच्या शोधासाठी निघाले. पोलिसांची गाडी पुढे आणि मागे साध्या वेशातील पोलिसांचे पथक खासगी गाडीत अशा पद्धतीने आपल्या लक्ष्याच्या दिशेने पोलिसांनी कूच केली. पथकात असलेले हवालदार कदम यांना मग आपल्या खबऱ्याशी संपर्क साधला. भट्टी नेमकी कुठे सुरू आहे याची खातरजमा केली आणि पोलिसांच्या गाडय़ा त्या दिशेने धावू लागल्या.ठरविलेले ठिकाण याही वेळी दाट झाडीतच होते. या ठिकाणी जाणारा रस्ता खडबडीत, केवळ एकच गाडी जाऊ शकेल असा. १५ मिनिटांचा रस्ता कापल्यानंतर गाडय़ा भट्टय़ा असण्याची शक्यता असलेल्या ठिकाणाजवळ गेल्या, परंतु पुढचा रस्ता झाडीझुडपांचा असल्याने गाडय़ा थांबवण्यात आल्या. ड्रोन कॅमेऱ्याच्या पथकाने मग आपली कामगिरी सुरू केली. कॅमेरा, त्याचा रिमोट यांची जुळवाजुळव केली. कॅमेरा आकाशात उडण्यास सज्ज झाला. पोलिसांनीही मग आपापल्या जागा घेतल्या. कॅमेरा आकाशात झेपावला आणि खालचे झाडाझुडपातले दृश्य टिपू लागला. स्वत: पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी रिमोटच्या स्क्रीनवर नजर ठेवली. थोडय़ाच वेळात एके ठिकाणी झुडपाखाली काही तरी दडवले असल्याचे स्क्रीनवर स्पष्टपणे दिसून येऊ लागले. कॅमेरा मग झूम करण्यात आला, तेव्हा चिखलात एक तात्पुरती शेड उभारलेली आणि जवळच काही तरी दडवलेले दिसून आले. याठिकाणी दारूची भट्टी असल्याची पोलिसांची खात्री पटली आणि साहाय्यक निरीक्षक साळुंखे, हवालदार कदम आणि पोलीस शिपाई बोरसे कामगिरीवर निघाले. झाडाझुडपातून वाट काढत, चिखल तुडवत अखेर त्या ठिकाणी ते पोहोचले, तेव्हा चिखलात दारू बनवण्यासाठी लागणारे मोठे पिंप दडवून ठेवलेले आढळून आले. याचा अर्थ या ठिकाणी नियमितपणे दारू तयार केली जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मग हे पिंप तोडून नष्ट केले.कॅमेऱ्याने मग आणखी तीन ठिकाणी सुरू असलेल्या भट्टय़ांची ठिकाणे उघडकीस आणली. या सर्वावर पोलिसांनी कारवाई केली. तयार केलेली दारू अथवा ती तयार करणारी माणसे हाती लागली नसली तरी भट्टय़ांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे समाधान पोलिसांच्या चेहऱ्यावर झळकत होते. आणखी काही भट्टय़ा दिसतात का याची खात्री केल्यानंतर तब्बल तीन साडेतीन तास सुरू असलेली ही मोहीम मग पोलिसांनी आटोपती घेतली.