ठाणे – पर्यावरणीय संसाधनाचा वापर आणि त्यातून शिक्षण प्रवाह सुरू ठेवण्याच्या उद्देशाने ठाण्यातील मोह विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि जनजागृती केंद्र उभारण्यात आले आहे. शाळेच्या शतकोत्तरी सोहळ्याच्या निमित्त माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीतून सौर उर्जा प्रकल्प आणि जनजागृती केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन समाजसेविका मेधाताई पाटकर यांच्या हस्ते होणार आहे.
ठाण्यातील मोह विद्यालय ही १३२ वर्ष जुनी शाळा आहे. या शाळेचा वर्षभरातील आर्थिक खर्चामध्ये एक लाखाहून अधिक खर्च हा वीज वापरासाठी होत होता. दैनंदिन कामासाठी विद्यालयात वापरली जाणारी वीज आणि त्यातून येणारा आर्थिक खर्च कमी व्हावा याकरिता विद्यालयात अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करून सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. शाळेचे माजी मुख्याध्यापक स. वि. कुलकर्णी यांच्या नावे सौरऊर्जा निर्मिती आणि जनजागृती केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
हेही वाचा – डोंबिवलीत फडके रोडवरील सराफाला ११ लाखाला फसविले
या प्रकल्पाची संकल्पना शाळेच्या शतकोत्तरी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नावारूपास आली. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाकरिता माजी विद्यार्थी संजय मंगला गोपाळ आणि लतिका सुप्रभा मोतीराम या दाम्पत्यांनी विद्यालयास आर्थिक मदत केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वीज बचत, आर्थिक बचत तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी, ४ जानेवारीला सकाळी ११ वाजता मोह विद्यालयाच्या सभागृहात केले जाणार आहे.
हेही वाचा – कल्याणमध्ये सात लाखाचा गुटखा जप्त; पाच आरोपी फरार
प्रकल्प कसा असणार ?
सौरऊर्जा प्रकल्प १९.५ किलोवॅटचा आहे. यासाठी एकूण साडेबारा लाख खर्च आला आहे. या प्रकल्पात थेट सुर्यप्रकाशामार्फत ऊर्जानिर्मित केली जाणार आहे. ही वीज महावितरण कक्षाकडे पुरवली जाणार आहे. विद्यालयात वापरली जाणारी वीज सौर ऊर्जेपासून तयार केलेली असणार आहे. तसेच रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी यातून तयार होणारी ऊर्जा महावितरण कक्षाला वापरता येणार असल्याची माहिती संजय गोपाळ यांनी दिली. देवाण घेवाण या पद्धतीने सौर ऊर्जा प्रकल्प कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हा प्रकल्प कसे कार्य करतो हे पाहण्यासाठी जनजागृती केंद्रदेखील उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे वीजेच्या वापरासाठी होणारा खर्च कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.