मोहपाडा, तालुका अंबरनाथ
खरे तर ‘विकास’ या शब्दाचा अर्थ सुविधा पुरविणे असा असणे अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात शहरी भागात विकास योजनांचा आणि सुविधांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसल्याचे दिसून येते. त्यातूनच झगमगत्या दिव्यांखाली अनेकदा अंधार असल्याचे आढळून येते. चौथी मुंबई म्हणून बराच गाजावाजा होत असलेल्या बदलापूरनामक दिव्याखालीही अंधाराचे अनेक पुंजके आहेत. मोहपाडा त्यापैकीच एक. स्मार्टसिटीचे स्वप्न पाहणाऱ्या चौथ्या मुंबईच्या खिजगणितीतही ही वस्ती नाही…

दिव्याखाली अंधार
चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणारं शहर म्हणजे बदलापूर. गेल्या काही वर्षांत या बदलापूरचं रूपडंच बदललं. एके काळी बदलापूर गाव, कुळगांव आणि कात्रप, मांजर्ली, बेलवली, हेंद्रेपाडा अशा विभागांचे मिळून बनलेले एक छोटे शहर एवढीच बदलापूरची ओळख होती. मात्र आता ही ओळख मागे पडली आहे. गावपण मागे सरून महानगराकडे बदलापूरची वाटचाल सुरू आहे. गेल्या काही वर्षांत अनेकांनी मोठय़ा प्रमाणावर बदलापूरची स्वप्नातील घरासाठीचे शहर म्हणून निवड केली. नोकरदारवर्ग मुंबईतून मोठय़ा प्रमाणावर येथे स्थलांतरित झाला. गाव ते शहर या संक्रमणावस्थेत शहराच्या वेशीवर असलेले पाडे मात्र दुर्लक्षितच राहिले. त्यातीलच एक पाडा म्हणजे मोहपाडा.
बदलापूर रेल्वे स्थानकापासून कात्रपमार्गे टीव्ही टॉवर, डॉ.आंबेडकर चौक मार्गे पुढे कीर्ती पोलीस वसाहतीकडून मोहपाडय़ाला जाण्यासाठीचा रस्ता आहे. बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास अडीच किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण मोहपाडय़ाला पोहोचतो. अजूनही तिथे विशेष अशी वाहतूक व्यवस्था नाही. पाडय़ापासून एक किलोमीटर आधी रिक्षाचा प्रवास थांबतो. पुढचा प्रवास पायीच. प्रस्तावित बदलापूर पनवेल मार्ग ओलांडल्यावर मोहपाडय़ाचा रस्ता लागतो.
कुडाच्या झोपडीला पंधरा हजार रुपये कर
मोहपाडय़ाकडे जातानाच आपल्या पुढची परिस्थिती काय असेल याचा अंदाज येतो. महामार्गाच्या दर्जाचा प्रस्तावित पनवेल मार्ग शेजारून जाऊनही मोहपाडय़ाच्या रस्त्यावर आता एक तपानंतरही डांबर पडलेले नाही. खड्डय़ाने भरलेला रस्ता आपले स्वागत करतो. पुढे टावलीच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेला छोटासा पाडा दिसतो. पाडय़ात प्रवेश करताच आपल्याला कौलारू मातीची घरे दृष्टीस पडतात. त्यात काही नवी सिमेंटची घरे मध्येच डोके वर काढताना दिसतात. मोहपाडय़ात जेमतेम ४५ घरांची लोकवस्ती आहे. त्यातील बरीचशी घरे ही मातीची, त्यात आजही काही कुडाची शेणाने लिंपलेली घरे दिसतात. मातीमध्ये घरांची बांधणी करून त्यावर सीमेंटचा लेप लावण्याचा प्रकार सध्या येथे सुरू आहे. मात्र यात हास्यास्पद बाब म्हणजे, याच कुडाच्या व मातीच्या घरांना तब्बल पंधरा हजार रुपये इतका मालमत्ता कर पालिकेने पाठवला आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी सरकारी योजनेतून आदिवासींना घरकुल बांधून दिले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज तीच घरे पुराणकाळातील वाटतील अशी आहेत. काहींच्या भिंती ढासळत आहेत, तर काहींचे दरवाजेच राहिले नाहीत. बरेच आदिवासी या घरांचा वापर जनावरांना बांधण्यासाठी करतात.
रोजगाराचा प्रश्न कायम
पाडय़ातील बहुतेक पुरुष मिळेल ते काम करून आपापला उदरनिर्वाह करतात. शेजारीच असलेल्या डोंगरावर जाऊन लाकूडफाटा मिळवून त्याची विक्री करणे, हा येथील आदिवासांचा नेहमीचा व्यवसाय. अनेक तरुण तुटपुंज्या शिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळातील खासगी कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करतात. मात्र तिथेही कायम नोकरीची हमी नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच. पालिकेच्या कराच्या पावतीवर रोजगार हमी योजनेचा उल्लेख असतो, त्यासाठी करही आकारला जातो. मात्र प्रत्यक्षात तसा कोणताही रोजगार यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. अशा या बेभरवशाच्या रोजगारामुळे आर्थिक अस्थिरता कायम असल्याचे पाडय़ातील राजू वाघ सांगतात. पाडय़ात आजही गॅस सिलेंडरचा वापर केला जात नाही.
शिक्षणाचा फायदा होत नसल्याची भावना..
एकीकडे शिक्षणावर कोटय़वधी रुपये जाहीर केले जातात, मात्र तरीही आज एक मोठा वर्ग उच्च शिक्षणापासून वंचित आहे. सरकारी आणि मोफतचे शिक्षण जोपर्यंत आहे, तोपर्यंत आमची मुले शिकतात, त्यानंतर पैशाअभावी शिक्षण सोडावे लागते, असे बाळू उघडे सांगतो. पाडय़ावरील दोनच तरुणांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. मात्र त्यांनाही मनाजोगता रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचा आणि इतरांचाही शिक्षणावरचा विश्वास उडाला आहे.
सध्या प्राथमिक शिक्षणाची सोय पाडय़ावर आहे. पुढील शिक्षणासाठी त्यांना बदलापूर शहरात जावे लागते. मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. पाडय़ावरील एकही मुलगी पदवीधर झालेली नाही. .
मोहपाडय़ात ठाकूर जातीचे आदिवासी आहेत. केवारे, आवाटे, वाघ, उघडे, बांगाटी, हिरवे, धुमणे अशा आडनावांची कुटुंबे अधिक आहेत. शिमग्याचा सण हे आदिवासी मोठय़ा प्रमाणात साजरा करतात. पाडय़ावर गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी समाज मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र निवडणुका संपल्यानंतर समाज मंदिराचे बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले.
आदिवासींच्या योजना असतात कुणासाठी..
आम्ही आदिवासी आहोत, गेल्या अनेक पिढय़ांपासून आम्ही येथे राहतो. ज्या वेळी शहराचा इतका विकास झाला नव्हता, तेव्हापासून आम्ही शहर पाहतो. मात्र त्या शहराने आमच्याकडे कधी पाहिले नाही, अशी खंत जुनेजाणते व्यक्त करतात. सरकारी योजनांची साधी माहितीही आम्हाला दिली जात नाही. काही छोटय़ा उपक्रमांची जेमतेम अंमलबजावणी करून आमची बोळवण केली जाते. निवडणूक काळात २०० मतदार असलेली वस्तीइतकीच आमची ओळख असल्याची भावना येथील तरुण व्यक्त करतात.

भीषण पाणीटंचाई
बारवी, भोज ही धरणे आणि शेजारून वाहणारी उल्हास नदी यामुळे बदलापूर शहराला पाणी कपातीतही टंचाई कधी जाणवत नाही. मोहपाडय़ात मात्र पाणी-प्रश्न पाचवीलाच पुजलेला आहे. पाडय़ावर सध्या पाच ठिकाणी सार्वजनिक नळ देण्यात आले आहेत. मात्र उंचसखल भागामुळे त्यातल्या तीन ठिकाणी पाणीच येत नाही. त्यामुळे उरलेल्या दोन ठिकाणी गावकऱ्यांची प्रचंड गर्दी होत असते. गेल्या काही काळापासून याच पाणी-प्रश्नावर गावकऱ्यांनी पालिकेवर मोर्चे काढले होते. मात्र आश्वासनांशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. दिवसातून पालिकेच्या नळाला जेमतेम एक तास पाणी येते. त्यात ४५ घरांनी पाणी कसे भरायचे, असा सवाल येथील रहिवासी विचारतात.

स्वच्छतागृहांची बोंब
देशभर ‘स्वच्छ भारत अभियाना’चे वारे वाहत असताना या पाडय़ात मात्र स्वच्छतेच्या नावाने बोंबच आहे. पाडय़ात एकही कचराकुंडी नाही. पालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी कधीही पाडय़ात येत नाहीत. पाडय़ात आतापर्यंत शौचालये नव्हती. अलीकडेच पालिकेच्या निधीतून पाडय़ात शौचालयांची उभारणी झाली. मात्र पाण्याची कमतरता असल्याने शौचालय बांधल्यानंतरही पुरेसे पाणीच नसल्याने पाडय़ातील नागरिक उघडय़ावरच शौचास जातात. पाडय़ावर अद्याप सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही.

Story img Loader