अंबरनाथः अंबरनाथ पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या आर. डी. जतकर यांच्याकडचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याजागी जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांच्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आले आहे. बदलापुरात एका शाळेत झालेल्या मुलीच्या विनयंभग प्रकरणानंतर संबंधित अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

शिक्षण विस्तार अधिकारी असलेले आर. डी. जतकर यांच्याकडे अंबरनाथ पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. बदलापूर शहरातील एका खासगी शाळेत एका शिक्षकाकडूनच या शाळेतील एका विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आला होता. हा शिक्षक सातत्याने विद्यार्थीनीला त्रास देत असल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणाची दखल राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्यांनीही घेतली होती. सदस्यांच्या पाहणीत या शाळेच्या वर्गांनाच परवानगी नसल्याची बाब समोर आली होती. तर कोणत्याही परवानगीविना येथे शाळा सुरू होती. त्यामुळे या शाळेवर कारवाई करण्यात आली. तर शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. या प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. बदलापुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करत विविध आरोप करण्यात आले होते. तर गटशिक्षणाधिकारी आर. डी. जतकर यांची चौकशी करावी अशीही मागणी करण्यात आली होती. अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आर. डी. जतकर यांच्याकडे असलेला अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार काढला असून तो जिल्हा परिषदेच्या उप शिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

फक्त बदली नको, बडतर्फ करा

आर. डी. जतकर यांच्याविरूद्ध आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस अविनाथ जाधव यांन जतकर यांची चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिक्षणमंत्री यांना भेटून निवेदनही दिले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.

Story img Loader