सात ते आठ जणांवर हल्ला; प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष

नियोजनाच्या समस्या आणि कचऱ्याची धुरकोंडी यामुळे हैराण असलेल्या दिवावासीयांना आता माकडाच्या उच्छादाने हैराण केले आहे. गेले काही दिवस या परिसरात एका माकडाने उच्छाद मांडला असून आतापर्यंत सात ते आठ जणांना त्याने चावा घेत जखमी केले आहे. एरवी परिसरात इकडे तिकडे बागडणाऱ्या या माकडाने अचानक नागरिकांवर हल्ला सुरु केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी मुंब्रा पोलिसांना याविषयी संपर्क साधला परंतू पोलीस अथवा महापालिका प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. तसेच काही रहिवाशांनी या प्रकरणी अग्निशमन तसेच वनविभागालाही संपर्क साधला आहे. मात्र, शासकीय यंत्रणांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने दिवावासी हैराण झाले आहेत.

वेगवेगळ्या स्वरुपात सुरू असलेल्या जनआंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून दिव्यातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण ढवळले आहे. येथील नागरी समस्यांविषयी कधी नव्हे, इतक्या प्रमाणावर चर्चा झाल्याने आता माकड उच्छादाचे नवे प्रकरण पुढे आल्याने प्रशासकीय यंत्रणांच्या नाकर्तेपणाचा मुद्दा पुढे करत यावरूनही येथे राजकारण रंगू लागले आहे. दिवा पूर्वेकडील बी.आर.नगर परिसरात एका माकडाने गेले सात ते आठ दिवस उच्छाद मांडला असून त्याच्या माकडलीलांनी येथील नागरिक हैराण झाले आहेत. या माकडाने सात ते आठ नागरिकांवर आत्तापर्यंत हल्ला केला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी या माकडाने सात वर्षीय बालकाच्या हाताला चावा घेतला असून त्याच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी सहा ते सात नागरिकांना चावा घेत किरकोळ जखमी केले आहे. स्थानिक डॉक्टरांकडे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. हे माकड पाळीव माकड आहे. परंतू मालकाने सध्या त्याला या परिसरात सोडून दिले आहे. येथील एका भटक्या कुत्र्यासोबत त्याची चांगली मैत्री आहे. श्वान आणि माकडाच्या या दोस्तीची नागरिक स्तुती करत असत. परंतू गेल्या काही दिवसांपासून हे माकड हिंस्त्र झाले असून त्याने परिसरात उच्छाद मांडला आहे.

नागरिकांना चावा घेत अनेकांच्या घरात घुसून ते अन्नपदार्थ तसेच इतर वस्तूही पळवीत आहे. या प्रकरणी आम्ही सर्वात प्रथम मुंब्रा पोलीस स्टेशनला कळविले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच अग्निशमन दल व वनविभागाशीही संपर्क साधला. परंतु आत्तापर्यंत एकही अधिकारी या विभागात फिरकलेला नाही. ठाणे महापालिकेला एक निवदेन आम्ही देणार असून नागरिकांना त्रास देणाऱ्या माकडाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी करणार आहोत.

-प्रवीण उतेकर, नागरिक.