दिवा
ठाणे महापालिका हद्दीचा एक भाग असलेल्या आणि दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीचे नवे विक्रम गाठणाऱ्या दिवा परिसरातील रहिवाशांना सार्वजनिक वाहतुकीसाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. या भागात ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस सुरू कराव्यात अशी मागणी बरीच जुनी आहे. मात्र, ठाणे शहरात सेवा पुरविताना दमछाक होत असलेले टीएमटी व्यवस्थापन दिव्यात बस सुरू करण्यास फारसे उत्साही नाही. त्यामुळे दिव्यातून ठाणे, कल्याणचा प्रवास करण्यासाठी दिवावासीयांना रेल्वे हाच महत्त्वाचा पर्याय आहे. सार्वजनिक वाहतुकीचा अन्य पर्यायच नसल्याने दिव्यात रिक्षा चालकांच्या कारभाराला आव्हानच नाही. या भागात जवळपास दोनशेहून अधिक रिक्षा बेकायदा धावत असल्याची माहिती आहे. त्याकडे आरटीओ आणि वाहतूक पोलीस ढुंकूनही पाहायला तयार नाहीत.

रिक्षाचा कारभार राम भरोसे
या परिसरात ४००-४५० रिक्षा चालविल्या जातात, असा वाहतूक पोलिसांचा अंदाज आहे. मात्र यातील तेमतेम २५ ते ५० रिक्षांकडे आरटीओचे परवाने आहेत. दिवा स्टेशन आणि बी.आर. नगर नाका या ठिकाणी रिक्षा थांबे उभे केले आहेत. मात्र, गणेशनगर येथे रहिवासी जास्त असल्याने आणि रिक्षा चालक सांगतात ते भाडे द्यावयास ते तयार असल्याने येथून भाडे घेण्यास रिक्षा चालक एका पायावर तयार असतात. १ किलोमीटरही अंतर नसणाऱ्या ठिकाणी शेअर रिक्षाचे भाडे १५ रुपये आहे. शिवाय आगासन फाटा आदी ठिकाणी जावयास झाले तर दोन किलोमीटरसाठी प्रवाशांना १०० रुपये मोजावे लागतात. ही भाडे प्रणाली प्रशासकीय यंत्रणांच्या गावीही नाही. शेअर रिक्षाच्या नावाखाली एका वेळी चक्क सहा प्रवासी कोंबले जाण्याचे प्रकारही या भागात दिसतात.

वाहतूक पोलीस आहेत कुठे?
ठाणे, भिवंडीकडे भलताच ओढा असणारे वाहतूक पोलीस दिव्यात अपवादानेच फिरकताना दिसतात. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्थेच्या अडवणुकीचे थांबे दिव्यात जागोजागी दिसतात. १४ ते १६ वयोगटातील मिसरूडही न फुटलेले अनेक तरुण या भागात बेलगाम पद्धतीने रिक्षा चालविताना दिसतात. वाहतूक पोलीस नसल्याने त्यांना लगाम कुणी घालायचा हा प्रश्न उरतोच. त्यामुळे रिक्षात बसून घरी पोहोचेपर्यंत प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वाहतूक पोलिसांची संख्या मुंब्रा वाहतूक विभागात मुळातच कमी आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस अनेकदा दिव्यात नसतात हे मान्यच आहे. तरीदेखील महत्त्वाच्या दिवशी आम्ही तेथे बंदोबस्त ठेवतो.
– संजय बुगणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंब्रा वाहतूक विभाग

एका वेळेस रिक्षात सहा प्रवासी घेणे बंद केले होते. या सर्व रिक्षा जुन्या असून प्रादेशिक परिवहन मंडळाने बाद केल्यानंतर या रिक्षावाल्यांची नवीन रिक्षा घेण्याची ऐपत नाही.
– विनोद भगत , रिक्षा मालक संघटना

भाग्यश्री प्रधान,

Story img Loader