ठाणे: जिल्ह्यात आरटीई अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी अद्यापही २ हजार ९६४ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात ६२७ शाळेतून ११ हजार ३२२ जागांवर आरटीई प्रक्रिया राबविली जात आहे. ११ हजार ३२२ जागांपैकी आतापर्यंत ८ हजार ३५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
वंचित, दुर्बल घटकातील मुलांना उत्तम दर्जेचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सध्या २०२५-२६ य़ा शैक्षणिक वर्षासाठी गेेले चार महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. ठाणे जिल्ह्यात ६२७ शाळेतून ११ हजार ३२२ जागांवर आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेला १४ जानेवारी पासून सुरुवात झाली असून ११ हजार ३२२ जागांसाठी जिल्ह्यातून २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. यातून, सुरुवातीला १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन ते तीन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ६ हजार ७०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली होती. विद्यार्थ्यांची निवड झाल्याचा संदेश पालकांच्या दुरध्वनी क्रमांकावर पाठविण्यात आला होता.
काही पालकांनी या संदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नाही, असा दावा त्यावेळी शिक्षण विभागाकडून करण्यात आला होता. त्यानंतर, उर्वरित जागांसाठी पहिली प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली. त्यात, २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी १ हजार १८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर, दुसऱ्या प्रतिक्षा यादीत ९५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातून, ४६७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. आतापर्यंत ११ हजार ३२२ जागांपैकी ८ हजार ३५८ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, २ हजार ९६४ जागा अद्यापही रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
तिसरी प्रतिक्षा यादी जाहीर
उर्वरित रिक्त जागांसाठी तिसरी प्रतिक्षा यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ७ मे पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
शहरनिहाय आरटीई प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत झालेले प्रवेश
शहर | निवड झालेले विद्यार्थी | प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी |
ठाणे | ३,२८५ | १,९४९ |
कल्याण-डोंबिवली | २,२६५ | १,२०० |
भिवंडी | ९५९ | ५९० |
मिरा-भाईंदर | ५०० | २४५ |
नवी मुंबई</td> | २,९२० | १,७६६ |
उल्हासनगर | १९४ | ८८ |
(तालुकानिहाय) | ||
अंबरनाथ | १,५२५ | ९६३ |
भिवंडी | ७८९ | ५२५ |
कल्याण | १,०१६ | ६०९ |
मुरबाड | १२५ | ८३ |
शहापूर | ५११ | ३४० |
एकूण | १४,०८९ | ८,३५८ |