शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे डोंबिवली पूर्वेतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पक्षनिष्ठेची हमीपत्रे लिहून घेण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसात ३०० हून अधिक शिवसैनिकांनी अशाप्रकारची हमीपत्रे भरून दिली आहेत. हमीपत्रे भरून देण्याचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. हा आकडा वाढणार आहे, अशी माहिती शिवसेना डोंबिवली उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील उध्दव ठाकरे यांच्याशी निष्ठावान असलेले शिवसैनिक या मोहिमेत सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फुटीरतेमुळे अनेक शिवसैनिक, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत असल्याने पक्षाशी असलेली आपली बांधिलकी कायम आहे, हे दाखविण्यासाठी ठाकरे गटाकडून शिवसैनिकांकडून पक्षनिष्ठतेची हमीपत्रे भरून घेण्यास सुरुवात झाली आहे.

डोंबिवलीतील निष्ठावानांमधील एक गट उघडपणे व्यक्त झालेला नाही –

निष्ठावान जुन्या सर्व शिवसैनिकांनी अशाप्रकारची हमीपत्रे भरून पक्षाकडे दिली आहेत. कधी उध्दव ठाकरे तर कधी एकनाथ शिंदे गटातील छायाचित्रांमध्ये दिसणारे काही शिवसैनिक नक्की कोणत्या गटात आहेत याविषयी शहरात आणि शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. हे निष्ठावान पक्षनिष्ठतेचे हमीपत्र भरून देण्यास कधी येतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. डोंबिवलीतील निष्ठावानांमधील एक गट उघडपणे व्यक्त झालेला नाही.

शिवसैनिक स्वेच्छेने शाखेत येऊन हमीपत्रे भरून देत आहेत. ही सर्व व्यवस्था शिवसेना मध्यवर्ती शाखेने केली आहे, असे उपजिल्हाप्रमुख थरवळ यांनी सांगितले. यावेळी शाखेत उपजिल्हाप्रमुख थरवळ, ज्येष्ठ शिवसैनिक तात्यासाहेब माने, उपशहरप्रमुख विवेक खामकर, अरविंद बिरमोळे, किशोर मानकामे, कल्याण डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, विधानसभा संघटक कविता गावंड, कार्यालय प्रमुख सतीश मोडक, अभिजीत थरवळ, अभय घाडिगावकर, शहर संघटक मंगला सुळे, महिला संघटक शिल्पा मोरे, ममता घाडिगावकर उपस्थित असतात.

लवकरच नियुक्त्या करण्याच्या हालचाली सुरू –

बंडखोरीनंतर डोंबिवली शिवसेना नवीन पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्त्या करण्याच्या हालचाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून सुरू आहेत. नवीन होतकरू चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांकडून वर्तविली जाते. येत्या कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीपूर्वी या नियुक्त्या होण्याची शक्यता सुत्राने वर्तविली. बंडखोरीनंतर कल्याण डोंबिवलीतील ४० हून अधिक शिवसेना नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. कल्याण मध्ये ठाकरे गटाने सचिन बासरे यांची शहरप्रमुख पदी निवड केली. डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांच्या जागाची कोणाची नियुक्ती होते याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

निष्ठावान शिवसैनिक स्वत: येऊन हमीपत्रे भरून देत आहेत –

“पक्षनिष्ठतेची हमीपत्रे लिहून घेण्याचा कार्यक्रम शिवसेना डोंबिवली मध्यवर्ति शाखेत सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक हमीपत्रे मातोश्रीकडे पाठविण्यात आली आहेत. निष्ठावान शिवसैनिक स्वताहून येऊन ही हमीपत्रे भरून देत आहेत.” असं शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ म्हणाले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 300 shiv sainiks in dombivli gave their assurances to matoshree msr
Show comments