कल्याण मधील विठ्ठलवाडी, शहाड भागातून वाहत असलेल्या वालधुनी नदी पात्रात मागील दोन महिन्यांपासून मातीचे भराव टाकून बांधकामे उभी केली जात आहेत. या बांधकामांमुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडून वालधुनी नदीचे पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरून रहिवाशांची दैना होणार आहे. हे माहिती असुनही कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, महसूल विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ वालधुनी नदी काठ भागातील तीन हजार कुटुंबीयांंनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वालधुनी नदी बचाव रहिवासी संघर्ष समितीने हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला की वालधुनी नदीचे पाणी विठ्ठलवाडी, शहाड भागातील नदी काठच्या झोपड्या, गृहसंकुलांमध्ये शिरते. दरवर्षी कल्याण डोंबिवली पालिकेला या भागातील पाण्याचा निचरा करताना कसरत करावी लागते. हे माहिती असुनही कल्याण डोंबिवली पालिकेने विठ्ठलवाडी पूर्व भागात वालधुनी नदी काठी बांधा, वापरा, हस्तांतरित करा तत्वावर एक बांधकाम प्रकल्प एका विकासकाला विकसित करण्यासाठी दिला आहे. या बांधकामासाठी नदीमधील अर्धा भाग मातीचा भराव टाकून बुजविण्यात आला आहे. या भरावामुळे नदीचा प्रवाह अरूंद झाल्याने पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती नसताना नदीचे पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये घुसून रहिवाशांना बेघर होण्याची वेळ येणार आहे, असे वालधुनी नदी बचाव रहिवासी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा… भिवंडी लोकसभा मतदारसंघ विकास कामांमध्ये ढ; महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांची टीका

यासंंदर्भात पालिका आयुक्तांपासून सर्व अधिकाऱ्यांना सांगुनही कोणीही संघर्ष समितीच्या तक्रारींची दखल घेत नाही. या भागातील रहिवाशांना जलमय करण्याचा आणि बेघर करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्याचा निषेध म्हणून या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे, असे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नदी पात्रातील बांधकामाच्या विरोधात आंदोलन आणि त्यानंतर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे, असा इशारा समितीने दिला आहे. पालिका अधिकारी मात्र या विषयावर मौन बाळगून आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गटाकडे १६ जागा, ठाणे-पालघरचा प्रश्न सुटला?

फलका्व्दारे इशारा

वालधुनी नदी पात्रातील बांधकाम कल्याण डोंबिवली पालिकेकडून थांबविली जात नाही तोपर्यंत आताच्या लोकसभा निवडणुकीपासून ते येणाऱ्या विधानसभा, पालिका निवडणुकीवरही वालधुनी नदी परिसरातील साईनगर भागातील रहिवासी बहिष्कार टाकतील, असा इशारा वालधुनी नदी बचाव रहिवासी संघर्ष समितीने वालधुनी नदी भागात साईनगर भागाच्या प्रवेशद्वारावर एका फलकाव्दारे दिला आहे. कल्याण परिसरात मतदान टक्का वाढविण्यासाठी शासन यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरू असताना या बहिष्काराच्या अस्त्रावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election voting on the issue of construction within river bed asj