उपवन, ठाणे
निसर्गरम्य येऊरच्या पायथ्याशी उपवनचा सुरेख तलाव आहे. हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला हेलकावणारे तलावातील पाणी हे येथील वैशिष्टय़ असून येथील आल्हाददायकपणा येथे येणाऱ्या नागरिकांना आकर्षित करतो. जॉगिंग ट्रॅक, व्यायामासाठी विस्तृत जागा, खेळासाठी मैदाने आणि विरंगुळ्यासाठी झाडाचे पार आणि भाविकांसाठी गणपतीचे मंदिर अशा सगळ्या गोष्टी इथे असल्याने येणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाचा परिपूर्ण आस्वाद घेता येतो. पूर्वी शहरापासून दूर असलेला उपवन तलाव शाळकरी मुलांसाठी सहलीचे ठिकाण होते. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे हा परिसर ठाणे शहराचा भाग बनला. या तलावाने आपले सौंदर्य आणि येथील शांतता कायम राखल्याने नागरिकांसाठी आरोग्यमय वातावरणाचा ठेवा येथे सापडतो. व्यायाम, भटकंती, खेळ, सराव, देवदर्शन आणि दोन घटकेचा निवांतपणा घालविण्यासाठी शेकडो ठाणेकर या भागाला पसंती देतात. आज ठाण्यात उपवन तलावाचे सौंदर्य अजूनही अबाधित आहे.

उपवन तलावाच्या समस्या..
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या उपवन तलावावर मानवी अतिक्रमणामुळे येथील सौंदर्याला धोका निर्माण होऊ लागला आहे. या तलावामध्ये मोठय़ा प्रमाणात घनकचरा टाकण्याचे प्रकार घडत असून त्यामध्ये प्रामुख्याने निर्माल्याचा समावेश आहे. तलावाबाहेर निर्माल्य कलश असतानाही अनेक जण तलावाबाहेरील कलशापेक्षा तलावात कचरा टाकत असल्याचे दिसून येते. याशिवाय या भागात दाखल होणारी काही मंडळी तलावाच्या पात्रात प्रात:विधी उरकत असल्याने परिसरात दरुगधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. परिसरातील अनेक ठिकाणचे अद्याप सुशोभीकरण झाले नसल्याने येथील गवताचा आणि मातीचा त्रास होत असतो. परिसरामध्ये सकाळपासूनच प्रेमी युगुलांची हजेरी सुरू होत असून त्यांच्याकडून केले जाणारे अश्लील चाळेही नागरिकांना सतावणारे असतात. याशिवाय उपवनच्या लगत असलेल्या रस्त्यावरील दुचाकीस्वारांचा उत्पात रहिवाशांसाठी जिवावर बेतण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे येथून चालणे, धावणे करताना नागरिकांना पुरेशी काळजी घ्यावी लागते.
खेळाची पुरेपूर व्यवस्था..
उपवन परिसरातील नागरिकांसाठी व्यायामासह खेळण्यासाठी विस्तृत मैदानाची सोयही झाली असून तलावालगतच्या भागामध्ये उपवन महोत्सवानंतर बनवण्यात आलेल्या मैदानावर तरुणांची सकाळपासूनच गर्दी उसळते. या भागामध्ये क्रिकेट, फुटबॉल, ज्युडो, किकबॉक्सिंगसारखे खेळ खेळण्याची आणि शिकवण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांना व्यायामासह खेळाचाही आनंद लुटता येतो. अनेक मान्यवर परीक्षक येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येत असून त्याचा लाभ मुलांकडून पुरेपूर घेतला जात आहे, अशी माहिती क्रीडा प्रशिक्षक मीनल वैद्य यांनी दिली.
उपवन मित्रमंडळाचा हास्य क्लब..
शहरातील प्रत्येक मॉर्निग स्पॉटवर एकत्र येणाऱ्या हास्य क्लब उपवनच्या काठावरही दररोज भरतो. गेल्या सात वर्षांपासून या भागात ही मंडळी एकत्र जमा होऊन टाळ्यांचे वेगवेगळे प्रकार सादर करतात. त्यामुळे या मंडळींना टाळी ग्रुप असे म्हटले जात असले तरी उपवन मित्रमंडळ ही या मंडळाची खरी ओळख. गणपत मालुसरे, प्रमोद सिंग, बबलू सिंग, विकास झगडे, विश्वास उतेकर, राजेश सैनी, विठ्ठल शेट्टी, जगन देसाई, सुभाष जगताप, अमर आंबड्रकर, प्रमोद सिंग, कैलाश यादव अशी सगळी मंडळी या गटामध्ये सहभागी आहेत. हास्य, व्यायाम, टाळ्या आणि चालणे हा या मंडळींचा नेहमीचा दिनक्रम बनला आहे.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

व्यायामासाठी सुविधा आवश्यक..
* व्यायामासाठी आवश्यक साधनांची गरज येथील नागरिकांना आहे. अनेकांनी खुल्या व्यायामशाळेची मागणी केली आहे.
* परिसरातील धुळीचे साम्राज्य असून येथील पाण्याचा वापर करून परिसरात उद्यान आणि हिरवळ फुलवण्याची मागणी होत आहे.
* कचराकुंडय़ा बसवून स्वच्छ वातावरण निर्माण करावे.
* तलावातील कचरा आणि गाळ दूर करून पाण्याची प्रकृती सांभाळावी.

अनुभवाचे बोल..
ठाणे शहरातील वेगवेगळ्या मॉर्निग स्पॉट्सवर खुल्या व्यायामशाळा बसवण्यात आल्या असून व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी त्याची उत्तम सोय झाली आहे. मात्र उपवन तलावाच्या काठी अद्याप अशी सुविधा सुरू झाली नाही. – अतुल पाटील

आम्ही तुलशीधाम परिसरात राहत असून उपवनपासून हा परिसर काहीसा लांब असला तरी येथील निसर्गसौंदर्याने येथे व्यायामासाठी येण्यास भाग पाडले आहे. आम्ही आठवडय़ातून चार दिवस इथे व्यायामासाठी येतो. – मौलिका आणि संदीप तिवारी

स्वच्छ हवा, चालण्यासाठी उत्तम व्यवस्था आणि प्रसन्न तलाव यामुळे इथे येणे नेहमीच आवडत असून येथील चालण्याचा अनुभवही खूप चांगला आहे. आठवडय़ातून एकदा तरी या भागात येऊन येथील निसर्गाचा आस्वाद घेणे गरजेचे आहे. – नेहा पांडव

पर्यटन क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले असले तरी पुरेशा सुविधा मात्र अद्याप इथे उपलब्ध झालेल्या नाहीत. सुरक्षारक्षकांची संख्या वाढवून येथील गैरप्रकार थांबवण्याची गरज आहे. तसेच इथली स्वच्छता, तलावामधील कचरा हटवण्याची गरज आहे. – जगन देसाई

उपवन काठावर सकाळपेक्षा सायंकाळचे रंग अनोखे आणि रंगतदार असतात. त्यामुळे सकाळपेक्षा संध्याकाळी येथील वातावरण मला आवडते. व्यायाम करण्यासाठी नुकतीच सुरुवात केली आहे. – बालकृष्ण