हल्लीच्या युगात घराची शोभा वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्यासाठी वेगवेगळी साधने, उपकरणे वापरली जातात. फिशटँक हा त्यातलाच एक प्रकार. फिशटँकमध्ये पाळले जाणारे मासे हे घरातील विशेष आकर्षण ठरते. टँकमधील मासे खेळकर आणि रंगीबेरंगी असतील तर घरही प्रसन्न राहते. याच रंगीबेरंगी आणि खेळकर माशांतील नावाजलेली प्रजात म्हणजे ‘टेट्रा’. त्यातही निओन टेट्रा मासे नेत्रदीपक ठरतात. हा मासा मूलत: आफ्रिकन ब्रीडचा आहे. या माशाच्या जवळजवळ १५०० प्रजाती आहेत. भारतात या टेट्रा माशाच्या पाच ते सहा प्रजाती आढळतात. हे मासे अत्यंत खेळकर स्वभावाचे असतात. आकाराने लहान असलेल्या या माशांचे गडद रंग मन मोहून घेतात. या टेट्रा माशांच्या बऱ्याच प्रजाती आहेत. नेओन टेट्रा, ग्लो लाइट टेट्रा, लेमन, बटरफ्लाय टेट्रा, रनी टेट्रा, ब्लॅकटेट्रा, क्रोंगो, प्रिस्टेला, सिल्व्हर टेट्रा, हेमिंग ग्राफ, रोझी टेट्रा, डायमंड टेट्रा, ब्लड टेट्रा, गोल्ड टेट्रा, मेक्सिकन टेट्रा इत्यादी.
या माशांना साधारणत: शांत स्वभावाच्या म्हणजेच गोल्ड, एंजल यांसारख्या माशांसोबत ठेवावे. रागीट स्वभावाच्या माशांसोबत त्यांना ठेवू नये. उदाहरणार्थ, डेनिअल आणि गुराती इत्यादी. अन्यथा हे मासे टेट्रा माशांना त्रास देतात. टेट्रा मासे पाळताना आणखी एक दक्षता घ्यावी. दहा ते पंधरा मासे एकत्र ठेवावेत. फिशटँकमध्ये ते समूहाने फिरतात. हे मासे एकत्र फिरताना खूप छान दिसतात. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर बहुतेक वेळा माशांचे विविध प्रकार दाखवण्यासाठी या माशांची चित्रफीत दाखवली जाते. पाण्यावर तरंगणारे खाद्य या माशांना द्यावे. या माशांची शरीरयष्टी मजबूत असल्यामुळे हे मासे काहीही खाऊ शकतात. या माशांना जिवंत मासे खाऊ घातल्यास त्यांची वाढ चांगली होते व त्यांचा रंग अधिक गडद होतो. हे मासे एक ते दीड इंचापर्यंत वाढतात. आकाराने लहान आणि रंगीबेरंगी असल्यामुळे टँकमधील दृश्य अधिक रमणीय दिसते. या माशांची ब्रिडिंग करायची असल्यास त्यांना एकत्र ठेवले जाते. त्यांची विशेष काळजी घेतली जाते. टँकमध्ये भरपूर झाडे लावली जातात. कारण मासे या झाडांच्या मागे आपली अंडी लपवून ठेवतात. इतर माशांनी ती अंडी खाऊ नयेत या भीतीमुळे ते आपल्या अंडय़ांची भरपूर काळजी घेतात. काही वेळेस हे मासे इतर माशांच्या भीतीमुळे स्वत:च ती अंडी खातात. मादी जेव्हा अंडी घालते, त्या वेळेस नर मासा अधिक आक्रमक होतो, परंतु इतर वेळेस हे मासे शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. विविध रंगांमुळे या माशांचे अधिक प्रमाणात ब्रिडिंग केले जाते. हे मासे कुठल्याही प्रकारे हानिकारक ठरत नाहीत. टेट्रा मासे असणारे टँकमधील पाणी नेहमी स्वच्छ ठेवावे लागते. तसेच टँकमधील पाणी स्वच्छ करताना या माशांना हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा वेळेस हे मासे घाबरण्याची शक्यता असते, तेव्हा त्यांना काळजीपूर्वक हाताळणे महत्त्वाचे असते. या माशांच्या पाण्यातील तापमानात सतत बदल करू नयेत. पाण्याच्या तापमानात समतोल राखावा. हे मासे अत्यंत स्वस्त दरात म्हणजे अगदी २० ते ४० रुपयांत बाजारात उपलब्ध आहेत.
किन्नरी जाधव
पेट टॉक : टेट्रा फिश टँकमधील रंगपंचमी
च रंगीबेरंगी आणि खेळकर माशांतील नावाजलेली प्रजात म्हणजे ‘टेट्रा’.
Written by किन्नरी जाधव
आणखी वाचा
First published on: 31-05-2016 at 04:39 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most popular tetra fish