कल्याण- टिटवाळा ते हेदुटणे ३० किलोमीटर बाह्य वळण रस्ते मार्गातील मोठागाव ते दुर्गाडी या सात किलोमीटर टप्प्याचे काम मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीची मंजुरी मिळाली नसल्याने अद्याप सुरू करण्यात आले नाही. या रस्ते कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यापूर्वी ५६१ कोटीचा निधी मंजुर केला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते.
बाह्य वळण रस्ते मार्गातील मांडा-टिटवाळा ते दुर्गाडी पुलापर्यंतची १५ किमी लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. या रस्ते मार्गातील तिसरा टप्पा मोठागाव ते दुर्गाडी पूल आहे. पत्रीपूल, खंबाळपाडा खाडी किनारा, ठाकुर्ली पश्चिम, गणेशनगर, देवीचापाडा मार्गे हा रस्ता मोठागाव माणकोली पुलापर्यंत आहे.
हेही वाचा >>> डायघर येथील कोयना प्रकल्पग्रस्त महिलेची जमीन हडप करण्याचा दिवा येथील व्यावसायिकाचा प्रयत्न
काही महिन्यापूर्वी या रस्ते कामासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे ५६१ कोटीचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला. उपलब्ध जागेचा वापर करुन तातडीने हे काम सुरू करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना बजावले होते. निधी मंजुर होऊन, निवीदा प्रक्रिया पार पडुनही हे काम सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
भूसंपादनाशिवाय काम नाही
वळण रस्ते कामासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने भूसंपादन करायचे आहे. जमीन मालकांना विकास हक्क हस्तांतरण, ताबा पावती घेणे, सात बारा पालिकेच्या नावे करणे या १०० टक्के प्रक्रिया पार पडल्यानंतर प्राधिकरण या रस्ते कामाला प्रारंभ करणार असल्याचे समजते. टिटवाळा ते दुर्गाडी रस्ते कामाच्यावेळी १०० टक्के भूसंपादन पालिकेकडून न होताच प्राधिकरणाने वळण रस्त्याचे काम तुकड्याने सुरू केले होते. त्यानंतर जमीन मालकांनी जमिनी देताना पालिका, प्राधिकरण अधिकाऱ्यांना काम करताना अनेक अडथळे आणले. त्याचे चटके प्राधिकरणाला बसले आहेत. त्यामुळे प्राधिकरणाचे अधिकारी पहिले १०० टक्के भूसंपादन करुन सात बारा पालिकेच्या नावे करा, असा आग्रह धरुन आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगरमध्ये दोन बेकायदा इमारतींची उभारणी, बनावट कागदपत्रांव्दारे सदनिकांची विक्रीची तयारी
मोठागाव ते दुर्गाडी दरम्यान वळण रस्त्यामध्ये सहा गावांमधील २२६ जमीन मालकांची जमीन बाधित होते. ८७ टक्के जमीन पालिकेने संपादित केली आहे. काही सातबारा उताऱ्यांवर १५ वारसांची नावे आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने त्या जमिनीचे भूसंपादन रखडले आहे. काही शेतकरी टीडीआर ऐवजी रोख, दामदुप्पट मोबदल्यासाठी अडून बसले आहेत, असे पालिका अधिकारी सांगतात. भूसंपादन करताना ताबा पावती, सात बारा उतारा या प्रक्रिया झटपट होणार नसल्याने पालिका अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. प्राधिकरणाचे अधिकारी मात्र रस्ता जमीन पालिकेच्या नावावर करुन घ्या. मग कामाला सुरुवात करतो यासाठी अडून बसले असल्याचे समजते.
टिटवाळा-दुर्गाडी रस्ते काम विलंबाने केल्याने महालेखापरीक्षकांनी प्राधिकरणावर ताशेरे ओढले आहेत. हे ताशेरे टाळण्यासाठी प्राधिकरणाचे अधिकारी आता काम हाती घेताना पालिकेकडे १०० टक्के भूसंपादनाची मागणी करत आहेत.
“मोठागाव-दुर्गाडी वळण रस्त्यासाठी ८७ टक्के भूसंपादन झाले आहे. निवीदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कार्यकारी समितीच्या मान्यतेनंतर तातडीने हे काम सुरू केले जाईल.” विशाल जांभळे- अधीक्षक अभियंता, एमएमआरडीए.