ठाणे : कापूरबावडी भागात आधार केंद्रावर आधारकार्ड बनविण्यासाठी निघालेल्या कुटुंबाच्या दुचाकीला एका कारने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कांचनकृपा अनंत (३३) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचे पती आणि दोन लहान मुलांना दुखापत झाली आहे. या अपघाताप्रकरणी कार चालकाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल्हेर भागात कांचनकृपा या त्यांचे पती कृपाशंकर, दोन मुलांसोबत (१२ वर्षीय आणि ७ वर्षीय) राहात होत्या. रविवारी दुपारी ते दुचाकीने आधारकार्ड बनविण्यासाठी काल्हेर येथून कापूरबावडी येथे पती आणि दोन मुलांसह जात होते. त्यांचे पती कृपाशंकर हे दुचाकी चालवित होते. ते दुचाकीने कशेळी रोड येथील दत्त मंदिर परिसरात आले असता, कृपाशंकर यांच्या वडिलांनी त्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यामुळे कृपाशंकर हे रस्त्याकडेला दुचाकी उभी करून वडिलांशी बोलत होते. त्याचवेळी मागून एक भरधाव कार आली. त्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे चौघेही दुचाकीवरून खाली पडले.

परिसरातून एक रिक्षा चालक जात होता. त्या रिक्षा चालकाच्या मोबाईल क्रमांकावरून कृपाशंकर यांनी त्यांच्या भावाला संपर्क साधला. त्यांना त्याच रिक्षामधून येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कांचनकृपा या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.