ठाणे – भारत-पाकिस्तान युद्धात लढताना शहीद झालेले कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांच्या मातोश्री आणि प्रसिद्ध लेखिका, व्याख्याता अनुराधा गोरे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना न्यायासाठी फिरावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. आपल्या सोसायटीमधील एक समस्या घेऊन सत्ताधारी आमदाराकडे गेली तर, त्याने समोरील व्यक्ती भाजप नेते किरीट सोमय्यांचा नातेवाईक असल्याने मला काही करता येणार नाही, असे सांगत हतबलता व्यक्त केली. सोसायटी संबंधी माझी खरी तक्रार असूनही मला इथे कोणीच मदत करत नाही. ही लढाई मी एकटीच लढते आहे आणि माझी समस्या मीच सोडवेन, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ठाण्यातील रसिक वाचक समुहाच्यावतीने २०२१ पासून आभासी पद्धतीने विविध विषयांवरील ९९ पुस्तकांवर रसग्रहण केल्यानंतर १०० वे पुष्प सहयोग मंदिर सभागृहात शनिवारी गुंफण्यात आले. ठाणे येथील सहयोग मंदीर हाॅल येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लेखिका अनुराधा गोरे यांनी स्वलिखीत पुस्तकांविषयीचा त्यांचा अनुभव प्रेक्षकांसमोर उलगडला. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक खंत व्यक्त केली.

देवाने मला दुख दिले आहे. पण, ते हेवा वाटावे असे. अनेकजण सांगतात की, काही लागले तर आम्हाला सांगा. पण, पतीमुळे मला कुणापुढे हात पसरायची वेळ आली नाही. तरी मला काही समस्या आहे का, तर, ती आहे. पण, ती वेगळ्या प्रकारची आहे. मी गेले काही वर्षे लढाई लढते आहे. सत्य विरुद्ध असत्य अशी ती लढाई आहे. तरीही सत्ताधारी पक्षाचा आमदार मला म्हणतो की, ती व्यक्ती भाजप नेते किरीट सोमय्यांचा नातेवाईक असल्याने मला काही करता येणार नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सोसायटीचे पदाधिकारी एक साधा निर्णय घ्यायला तयार नाहीत. तुमच्या पैकी अनेकांना माहिती असेल की, सोसायटीमध्ये देखभाल व दुरुस्ती शुल्क भरत नसलेला व्यक्ती सोसायटीचा सेक्रेटरी होऊ शकत नाही. पण, आमच्या सोसायटीत देखभाल व दुरुस्ती शुल्क भरत नसलेला व्यक्ती सेक्रेटरी आहे. धमकीची पत्र पाठवतो, फोन करतो आणि खोट्या नोटीसा पाठवतो. ही माझी खरोखर तक्रार आहे आणि इथे मला कोणीच मदत करत नाही. ही लढाई मी एकटीच लढते आहे. माझी समस्या मीच सोडवेन, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शहीदांच्या कुटूंबियांना तुम्ही आदर दाखवला नाहीतर चालेल पण, अशा परिवारांना मदतीची गरज असेल तर ती जरूर करा, असेही त्या म्हणाल्या. शहीदांचे कुटूंब हे अनेक समस्यांशी लढत असते आणि त्यांना कधीच आर्थिक मदतीची गरज नसते. कारण त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. त्यामुळे या कुटूंबांना केवळ मानसिक आधाराची गरज असते, असे त्या म्हणाल्या.

अनुराधा गोरे कोण आहेत.

प्रसिद्ध लेखिका, व्याख्याता आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अनुराधा गोरे या परिचित आहेत. त्या मुंबईत पार्ले टिळक विद्यालयात माध्यमिक शिक्षिका होत्या. तर, रामदेव पोतदार शाळेत मुख्याध्यापिका म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्या ‘वीरमाता’ म्हणूनही ओळखल्या जातात. १९९५ मध्ये त्यांचा मुलगा, कॅप्टन विनायक विष्णू गोरे हे वयाच्या २६ व्या वर्षी शहीद झाले.

भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात ते शहीद झाले. त्यानंतर त्यांनी सैन्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी व्याख्याने दिली, लेख लिहिले आणि पुस्तकेही प्रकाशित केली. त्यांनी शाळा, कॉलेज आणि विविध ठिकाणी व्याख्याने देऊन तरुणांना सैन्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.