कल्याण- कल्याण, डोंबिवली परिसरात दुचाकी, मोटार, रिक्षा चोरणाऱ्यांचा गेल्या काही महिन्यांपासून सुळसुळाट झाला आहे. रस्ते, इमारतीं समोर उभ्या केलेल्या मोटार, रिक्षा, दुचाकींना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. बहुतांशी वाहने नोकरदार, व्यावसायिकांच्या असल्याने त्यांची कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडण्यासाठी विशेष तपास पथके तयार केली आहेत. आठवड्यातून एक ते दोन दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे दुचाकी चोर पकडले तरी त्यांचे फरार साथीदार दुचाकी चोरी करत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे.
पोलिसांनी सांगितले, राजेश सत्यनारायण पांडे (रा. फेज दोन, राॅईस, गांधारी पूल, कल्याण) यांनी आपली मारुती सुझुकी मोटार राॅईस इमारती समोरील सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावर एका झाडाखाली हॅन्डल लाॅक करुन ठेवली होती. रविवारी सकाळी राजेश पांडे हे कामा निमित्त बाहेर पडुन आपल्या मोटारीतून जाणार होते. चार लाख ५० हजार रुपये मोटारीची किंमत आहे.
राजेश यांना झाडाखाली मोटार दिसली नाही म्हणून त्यांनी गांधारी, आधारवाडी परिसरात शोध घेतला. त्यांना मोटार आढळून आली नाही. मोटार चोरीला गेल्याची खात्री पटल्यावर राजेश यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात इसमा विरुध्द मोटार चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. राॅईस इमारत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण, मोटार कोणत्या मार्गाने चोरट्याने नेली याची माहिती पोलीस चित्रीकरणाच्या माध्यमातून घेत आहेत.
नांदिवली रस्त्यावर चोरी
सागर जाधव हे नोकरदार कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली भागात राहतात. शनिवारी रात्री कामावरुन घरी परत आल्यावर सागर यांनी दुचाकी घरा जवळील पेट्रोल पंपा जवळ नेहमीच्या जागेत उभी करुन ठेवली. रविवारी सकाळी ते घरा बाहेर पडले. त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला. दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
तिसगाव येथे चोरी
कल्याण पूर्वेत तिसगाव मधील १०० फुटी रस्ता भागातील रोहिदास इमारतीत जितेंद्र पाठक राहतात. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यसाय आहे. ते दररोज कार्यालय ते घर प्रवास आपल्या मारुती सुझुकी मोटारने करतात. रविवारी रात्री १० वाजता त्यांनी कामावरुन परतल्यावर मोटार घरा समोरील रस्त्यावर उभी केली. सकाळी ते कामावर जाण्यासाठी निघाले. त्यांना रस्त्यावर मोटार दिसली नाही. त्यांनी परिसरात तपास केला. मोटार आढळली नाही. मोटार चोरीला गेल्याची तक्रार जितेंद्र पाठक यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे.