डोंबिवली- कल्याण-शिळफाटा, काटई नाका ते बदलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक दुचाकी स्वार उलट मार्गिकेतून प्रवास करत असल्याने समोरुन येणाऱ्या वाहन चालकाला अशा वाहनांचा अंदाज येत नसल्याने या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आठवड्यातून दोन ते तीन अशाप्रकारच्या अपघातांच्या घटना या रस्त्यावर घडत आहेत. शिळफाटा रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. या कोंडीतून सुटका करुन घेऊन मोकळ्या रस्त्यावर वेगाने प्रवास करण्यासाठी अनेक दुचाकी स्वार येणाऱ्या, जाणाऱ्या मार्गिकांचा अवलंब न करता मोकळा रस्ता मिळेल अशा मोकळ्या रस्त्यामधून वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन घुसतात.
समोरुन येत असलेल्या वाहन चालकाला उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकाचा अंदाज न आल्याने दोन्ही वाहने समोरा समोरुन येऊन अपघात होत आहेत. यामध्ये मोटार कार आणि दुचाकी स्वार यांच्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. काटई-बदलापूर रस्ता, शिळफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक पेट्रोल पंप, हाॅटेल चालक, वाहन दुरुस्ती दुकान मालक यांनी फोडून ठेवले आहेत. या दुभाजकांचा गैरवापर अनेक वाहन चालक करत आहेत.
प्रत्येक फोडलेल्या दुभाजकाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करणे वाहतूक विभागाला शक्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणचा वापर काही बेशिस्त वाहन चालक करुन अपघाताला आमंत्रण देत आहेत, अशी माहिती या रस्त्यावरुन नियमित येजा करणाऱ्या वाहन चालकांनी दिली.
डोंबिवलीतील टिळकनगर मधील समाज मंदिर सभागृहाजवळ राहत असलेल्या वंदना मिरकुट या आपल्या दुचाकी वरुन काटई नाका येथून बदलापूर रस्त्याने जात होत्या. खुशाला हाॅटेल समोरील रस्त्यावरुन त्या जात असताना उलट मार्गिकेतून आलेला दुचाकी स्वार फैझल अब्दुल कादर मेमन (रा. मुंब्रा) याने वंदना मिरकुट यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. फैझल याच्या दुचाकीवर तीन जण बसले होते. दुचाकीच्या वहन क्षमतेपेक्षा अधिक जण दुचाकीवर बसल्याने फैझलला दुचाकीचा तोल सांभाळता येत नव्हता. फैझलच्या दुचाकीने वंदना यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या हाता, पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन दुचाकी चालवून आपल्या अपघातास कारणीभूत ठरला म्हणून वंदना यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. असाच प्रकार गेल्या आठवड्यात खोणी पलावा ऑर्चिड येथे झाला होता. उलट मार्गिकेतून येऊन एका तरुणाने सरळ मार्गाने जात असलेल्या तरुणाला जोराची धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. अशा उलट मार्गिकेतून येऊन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी मोटार वाहन कायदयाने कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.