गेल्या आठवडय़ात मोटरमननी केलेल्या आंदोलनानंतर मुंबईच्या लोकलसेवेचा बोजवारा उडाला. साहजिकच प्रवाशांनी मोटरमनना शिव्यांची लाखोली वाहिली. पण मोटरमनच्या मूळ प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने पाहिले नाही. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे प्रत्येक मोटरमन कामाच्या वेळेपेक्षा अधिक तास लोकल चालवीत आहे. यामुळे त्यांच्यावर वाढणारा ताण त्यांच्यासाठी अपायकारक आहेच. पण त्याहीपेक्षा लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी हा मोठा धोका आहे.

पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील उपनगरीय पसारा मोठा आहे. मध्य रेल्वे कसारा, कर्जत, खोपोली, हार्बरचा वाशी, पनवेल, अंधेरी तर पश्चिम रेल्वे ही विरार, डहाणूपर्यंत पसरली आहे. जवळपास ७५ लाखांहून अधिक प्रवासी या तीनही मार्गावरून प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी ही सर्वप्रथम मोटरमनवरच असते. परंतु याच मोटरमनला रिक्त जागा व अतिरिक्त कामाचा ताण यांनी ग्रासले आहे. मध्य रेल्वेवरील मोटरमनच्या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाने गेल्या काही वर्षांत लक्षच घातलेले नाही. चार ते पाच वर्षांत मोटरमनच्या जागा मोठय़ा संख्येने रिक्त झाल्या. त्यामुळे कार्यरत मोटरमनला ओव्हरटाइम करावा लागतो. मध्य रेल्वेवर ८९८ मोटरमनच्या पदांना मंजुरी असतानाही ६६९ मोटरमन कार्यरत आहे. २२९ जागा रिक्त आहेत. मोटरमनची कामाची वेळ सात तासांची. मात्र गेल्या काही वर्षांत मध्य व पश्चिम रेल्वेवर असलेल्या मोटरमनच्या रिक्त जागांमुळे हीच डय़ुटी १०४ तासांच्याही वर जात आहे. १४ दिवसांमध्ये १०४ तासांपेक्षा अधिक काम होत असेल, तर प्रत्येक तासाचा ओव्हरटाइम म्हणून मोटरमनला देण्यात येतो. त्याचा मोबदला मिळत असला तरी ताण वाढल्याने त्याचा परिणाम कामावर होतो, असा दावा मोटरमन करतात.

कामाचा अतिरिक्त ताण आणि त्यातच लाल सिग्नल चुकवल्याप्रकरणी २४ मोटरमनवर कामावरून कमी करण्याची असलेली टांगती तलवार या कारणांमुळे मध्य रेल्वे मोटरमनकडून ओव्हरटाइम करण्यास नकार दिला व नियमानुसार काम आंदोलनाचे हत्यार उपसले. ते शमवताना मध्य रेल्वेवरील रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले गेले. तसेच, येत्या दोन महिन्यांत ४८ मोटरमनची भरती आणि पुढील एक ते दीड वर्षांत आणखी जागा भरण्याचे आश्वासन देऊन मोटरमनचे आंदोलन थंड केले गेले. पण यामुळे मोटरमनचे प्रश्न संपण्याची शाश्वती नाही.

रेल्वेचा कामाचा भार वाढतोच आहे. वाढलेल्या लोकल फेऱ्या व त्यातच असलेल्या रिक्त जागांमुळे कामाचा ताणही वाढतो आहे. १९९८-९९ मध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बरवर मिळून १,०७७ लोकल फेऱ्या होत होत्या. २०१५-१६ मध्ये १,६४७ लोकल फेऱ्या धावू लागल्या. आता फेऱ्यांची हीच संख्या १,७०० पेक्षाही जास्त झाली आहे. १९९८-९९ मध्ये दररोज २६ लाख प्रवासी प्रवास करीत होते. आता हाच आकडा ४२ लाखांपेक्षा अधिक झाला आहे. पश्चिम रेल्वेवर हीच परिस्थिती आहे. २०१४-१५ मध्ये १,३०० लोकल फेऱ्या होत्या. दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करीत होते. आता प्रवासी संख्या तेवढीच राहिली. मात्र आणखी २३ फेऱ्यांची भर त्यात पडली. ही संख्या पाहिल्यास मोटरमनवरील जबाबदारी बरीच वाढल्याचे दिसते.

हेच काम करताना लाल सिग्नल चुकवल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलला जातो. लाल सिग्नल का ओलांडला गेला याचे कारणही समजून न घेता रेल्वेकडून कठोर कारवाई केली जाते. यात किरकोळ कारणेही बरीच असतात. तरीही ती समजून घेतली जात नाहीत, असा आरोप मोटरमन करतात. परंतु काहीही कारण असो, मोटरमन हा पूर्णपणे प्रशिक्षित असतो. त्यामुळे किरकोळ कारण जरी असले तरीही सिग्नल चुकवणे हा प्रवाशांच्या जिवाशी खेळच असल्याने त्याला माफी नाही, असा पवित्रा रेल्वे प्रशासन घेते. गेली अनेक वर्षे असलेला या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

मध्य रेल्वेसारखीच स्थिती काही वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवरही होती. तेव्हा मोटरमननी आंदोलनाचा बडगा उगारला. त्या वेळी रिक्त जागा भरल्या गेल्या. आता पश्चिम रेल्वेवर जवळपास ५२१ मोटरमन कार्यरत असून केवळ ४० रिक्त जागा आहेत. चार ते पाच वर्षांपूर्वी रिक्त जागांची संख्या खूप मोठी होती. मात्र रिक्त जागा भरून काढण्यात आल्यानंतर आता लवकरच १६ मोटरमन सेवेत येतील व त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी मोटरमन भरती होतील. ही सुधारणा झाल्याने मोटरमनवरील बराचसा ताण कमी झाला आहे. मात्र मध्य रेल्वेवरील ही समस्या अद्यापही सुटू शकलेली नाही. त्यामुळे आपले प्रश्न सोडवण्यासाठी मोटरमनला आंदोलनाचे हत्यार उपसून लक्ष वेधावे लागते. २०१० पासून तर आपल्या विविध मागण्यांसाठी मोटरमनकडून करण्यात आलेल्या आंदोलनांत वाढच झाली. ३ व ४ मे २०१० रोजी पे कमिशन, रिक्त जागा या कारणांसाठी पश्चिम व मध्य रेल्वेवरील मोटरमनकडून मोठे आंदोलन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या आंदोलनात लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत झाल्याने हिंसेचेही पडसाद उमटले. त्या वेळी सरकारने ‘मेस्मा’ लागू केला व १४ मोटरमनना अटकही केली. आंदोलन शांत होताच मोटरमनवरील ही कारवाई मागे घेण्यात आली. हे मोटरमनकडून करण्यात आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे व तीव्र आंदोलन होते. २० जुलै २०१२ रोजीही मोटरमनला प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीमुळे सुरक्षेच्या मुद्दय़ांवरून मोटरमनकडून सामूहिक सुट्टी आंदोलन करण्यात आले. तर २० सप्टेंबर २०१३ मध्ये मध्य रेल्वे मोटरमन व गार्डने केलेल्या संयुक्त आंदोलनात लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकाचे तीनतेराच वाजले होते. या आंदोलनामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मोटरमनला प्रवाशांचा रोषही ओढवून घ्यावा लागला. आता १० ऑगस्ट रोजीही मध्य रेल्वे मोटरमनने गेली अनेक वर्षे रिक्त जागा भरत नसल्याने व लाल सिग्नल चुकवल्याप्रकरणी मोटरमनला कामावरून कमी करीत असल्याने त्याला विरोध म्हणून आंदोलन केले. मोटरमनला आतापर्यंत आपल्या मागण्यांसाठी नेहमीच झटावे लागले. प्रशासनाकडून सहजरीत्या त्याची दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाचे हत्यार उपसूनच त्याची तीव्रता मोटरमनला दाखवावी लागत आहे. मोटरमनच सुरक्षित नसेल, तर प्रवाशांचा प्रवास तरी कसा सुरक्षित होईल हा मोठा प्रश्न आहे.

Story img Loader