आपल्याकडे हमखास पाहायला मिळणारे आणखी एक फुलपाखरू म्हणजे मॉटल्ड इमिग्रंट. हिरवट, पिवळ्या किंवा पोपटी रंगाचे हे फुलपाखरू कायम भटकत असते म्हणून हे इमिग्रंट आणि याचा पोपटी रंग सगळीकडे एकसमान नसतो तर ढगाळ असतो म्हणून मोटल्ड.
वर वर्णन केल्याप्रमाणे या फुलपाखराचे पंख ढगाळ पोपटी असतात, शिवाय इतर फुलपाखरांपेक्षा याच्या पंखांवरील वाहिन्या जास्त उठावदार असतात. अनेक काळ्या समांतर पण अस्पष्ट रेषासुद्धा पंखांवर असतात.
मोटल्ड इमिग्रंट फुलपाखरू संपूर्ण दक्षिण आशियामध्ये आणि त्यातही भरपूर पावसाच्या भागात जास्त आढळतात, आपल्याकडे सह्य़ाद्रीच्या डोंगराळ भागातही दिसतातच.
या फुलपाखराला अंडी ते प्रौढ अवस्थेपर्यंतचा प्रवास पूर्ण करायला साधारणत: २९ दिवस लागतात, म्हणून एका वर्षांत याच्या अनेक पिढय़ा जन्माला येतात.
कैशिया कुळातील झाडावर उदा बहावा या फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात. अंडी घालण्यासाठी मादी फुलपाखरू एखादे योग्य झाड शोधतात. आपल्याला पाहिजे तेच झाड आहे याची खात्री करण्यासाठी मादी झाडाच्या पानांवर आपल्या पायांवरील काटय़ांनी खरवडते, या ओरखडय़ांमधून पानातला द्रव बाहेर येतो, या द्रवाची ओळख पटवून घेऊनच होस्ट झाड निश्चित होते.