लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूरः गेल्या काही वर्षांपासून फक्त कागदावर असलेल्या मुरबाड तालुक्यातील पेंढरी धरणाच्या उभारणीसाठी आता शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी खासगी वाटाघाटीच्या माध्यमातून जमीन ताब्यात घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या धरणाच्या उभारणीमुळे आसपासच्या शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुरबाड तालुक्यातील पेंढरी येथे कणकविरा नदीवर धरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. २०१७ वर्षात या धरणाच्या कामाला सुरूवातही झाली. त्यासाठी राज्य सरकारने साडे सात कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र धरणाच्या कामासाठी आवश्यक जमीन ताब्यात नसल्याने धरणाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. धरण परिसरातील प्रधान पाडा, गोड्याचा पाडा, वैशाखरे, तळवली, करसोंडे, टोकावडे, खापरी, हेदुळी भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी पेंढरी धरण महत्वाचे आहे. धरण उभारल्याने आसपासच्या शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. धरण नसल्याने या भागातील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना बारमाही उत्पादन घेता येत नव्हते. पेंढरी येथील ग्रामस्थ आणि काही शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर या प्रश्नावर कपिल पाटील यांच्याकडून महसूल, वन विभागासह संबंधित अधिकाऱ्यांबरोबर दोन बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये तांत्रिक मुद्द्यांवर कार्यवाही करून, भूसंपादनासाठी खाजगी वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी नुकत्याच शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीसा जारी केल्या आहेत.

आणखी वाचा-डोंबिवलीतील आयरे गावातील बुजविलेल्या तलावाची चौकशी

असे असेल धरण

सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या खर्चाच्या पेंढरी धरणाची उंची २२ मीटर आहे. या धरणाच्या माध्यमातून या भागातील ग्रामस्थांच्या पिण्याचा प्रश्न सुटेल. त्याचबरोबर भेंडी व भाजीपाल्याच्या पिकासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहेत. पेंढरी धरणाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल ग्रामस्थांकडून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आभार मानण्यात आले आहेत.

Story img Loader