डोंबिवली – डोंबिवली पश्चिम उल्हास खाडी किनारचे बहुतांशी कांदळवनाचे घनदाट जंगल नष्ट झाले असले तरी उपलब्ध जंगलात नियमित पक्ष्यांबरोबर दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास आणि संचार या भागात अधिक प्रमाणात वाढला आहे, असे या भागात नियमित भ्रमंती करणारे पर्यावरणप्रेमी नागरिक, निसर्गप्रेमी छायाचित्रकार सांगतात.

दिवा, कोपर, भोपर, डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, खंबाळपाडा हा कांदळवनाचा सात ते आठ किलोमीटरचा घनदाट जंगलाचा पट्टा मागील वीस वर्षाच्या कालावधीत वाळू माफिया, चाळ माफिया यांनी स्वार्थासाठी उध्वस्त केला आहे. या भागातील जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. या भागातील कांदळवनाचे पट्टे नष्ट करण्यात आल्याने अनेक प्राण्यांचे अधिवास, जलचरांचे आश्रयस्थान नष्ट झाले आहे. अशाही परिस्थितीत या पट्टयात अनेक भागात खाडी किनारी कांदळवनाचे जंगल काही जागरूक पर्यावरणप्रेमी नागरिकांमुळे शिल्लक आहे.

या कांंदळवन जंगलात अनेक स्थानिक, स्थलांतरित पक्षी यांचा अधिवास आहे. माशांसाठी ही कांदळवने म्हणजे निवारा आणि सुखरूप प्रजननासाठीची ठिकाणे आहेत. या पाणथळ भूमीला पूरक गवत, जंगली झुडपे, इतर प्रकारची वृक्षराजी आहे. या कांदळवनाचे जंगल आणि आजुबाजुंच्या झुडपांमध्ये लांब शेपटीचा कमळ पक्षी, ग्रेटर पेंटेड स्नाईप, पाणलावा, स्लेटी ब्रेस्टेड रेल, रुडी ब्रेस्टेड क्रेक, बेलेनस क्रेक अनेक प्रकारचे पक्षी आढळून येत आहेत. पल्लास ग्रास हाॅपर वाॅल्बर हा पक्षी डोंबिवली खाडी किनारा भागात नव्याने दिसू लागला आहे. या पक्ष्यांचा मुक्त छंद विहार पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी नागरिक खाडी किनारी भ्रमंतीसाठी येतात.

पक्ष्यांच्या विषयावर अभ्यास करणारे ठाणे, मुंबई, पुणे, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील अभ्यासक या भागात नियमित येतात. या भागातील जैवविविधता टिकून राहण्यासाठी या भागातील पाणथळ भाग, अस्तित्वामधील कांदळवनाचे जंगल टिकून राहणे, त्याचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून देण्यात येत आहेत. ही जैवविविधता कायम राहिली तर ऋतु चक्राप्रमाणे भ्रमंती करणारे या भागात येत राहतील अन्यथा असे स्थलांतरित पक्षी जैवविविधता संपली की त्या भागाकडे पाठ फिरवतात, असे पर्यावरणप्रेमी सांंगतात.

डोंबिवली खाडी किनारी कांदळवनाचा ठराविक पट्टा शिल्लक आहे. उपलब्ध पाणथळ भागात विविध प्रकारची जैवविविधता पाहण्यास मिळते. स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचे, माशांचे हे कांदळवन पट्टे, पाणथळ भूभाग अधिवास आहेत. सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी अस्तित्वातील कांदळवन जंगलांच्या संवर्धनासाठी, जैवविविधतेच संगोपन करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. रुपाली शाईवाले– पर्यावरणप्रेमी.

२५ वर्षापूर्वी डोंबिवली पश्चिम खाडी किनारा भागात खारफुटीचे घनदाट जंगल होते. विविध प्रकारचे स्थानिक, स्थलांतरित पक्षी याठिकाणी पाहण्यास मिळत होते. काही समाजकंटकांनी या भागात स्वार्थासाठी कांदळवनांची कत्तल केली. खाडी किनारा भागात भराव टाकून जलस्त्रोत बुजविले. भोपरसारखी निसर्ग संपन्न टेकडी उध्वस्त करून पक्ष्यांचे अधिवास नष्ट केले. या भागातील पक्षी जीवन टिकून ठेवण्यासाठी अस्तित्वातील खारफुटी जंगलाचे संवर्धन खूप महत्वाचे आहे. राजन जोशी- उद्योजक, पक्षीप्रेमी छायाचित्रकार.