लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ला येथे हिंदू भाविकांना देवीच्या दर्शनासाठी प्रवेश बंद असतो. हा प्रवेश खुला करावा म्हणून मागील अनेक वर्षापासून शिवसेनेतर्फे सुरू असलेले घंटानाद आंदोलन गुरुवारी सकाळी लालचौकी भागात करण्यात आले. शिवसेेनेतील शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते या आंदोलनात एकत्रितपणे सहभागी झाले होते.
बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी परिसरात मुस्लिम समाजातर्फे नमाज पठण केले जाते. या कालावधीत सामाजिक सलोखा आणि शांतता रहावी म्हणून पोलिसांकडून दुर्गाडी किल्ल्यावर देवीच्या दर्शनासाठी जाण्यास हिंदू भाविकांना मज्जाव असतो. देवळातील घंटा पोलिसांकडून बांधून ठेवण्यात येते. ही बंधने काढून टाकावीत म्हणून मागील अनेक वर्षापासून माजी जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून कल्याणमध्ये घंटानाद आंदोलन केले जाते.
हेही वाचा… बेकायदा इमारती, चाळींमुळे कल्याण-डोंबिवली तुंबली
गुरुवारी सकाळी लालचौकी भागात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, शहरप्रमुख रवी पाटील, माजी आ. रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून लालचौकी भागातील रस्ते सुरक्षा अडथळे उभारुन बंद केले होते. परंतु, आक्रमक झालेल्या दोन्ही गटातील शिवसैनिकांनी अडथळे ओलांडून दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखले.
अडथळे ओलांडत असताना पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात काही वेळ बाचाबाची झाली. पोलिसांनी तात्काळ आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.