ठाणे : ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर दिवसेंदिवस वारांगनांचा वावर वाढला असून यामुळे स्थानक भागातून प्रवास करणाऱ्या तरुणी आणि महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याबाबत वारंवार रेल्वे आणि पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने शिवसेना (ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी आनंद सिनेमा येथे सह्यांची मोहीम राबवून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या भागात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमणात असते. त्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाप्रमाणेच पूर्व स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाचा वर्षभरात चेहरामोहरा बदलणार आहे. असे असतानाच, या भागात गेल्या काही महिन्यांपासून वारांगनांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हाच मुद्दा शिवसेना (ठाकरे) महिला आघाडीने उपस्थित करत याप्रकरणी सह्यांची मोहीम राबवून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
ठाणे स्थानकबाहेर वारांगनांच्या वावरामुळे या परिसरातील नागरिकांना लज्जास्पद वाटत आहे. या परिसरात लहान शाळकरी तरुण मुलं मुली तसेच तरुण मुली महिला रेल्वेने प्रवास मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्यामुळे एखादी तरुण मुलगी किंवा महिला जर रेल्वे स्थानकामध्ये कोणाची वाट पाहत उभी असेल तर काही नागरिक वारांगनांमुळे संशयास्पद वृत्तीने पाहत असतात. त्यामुळे येथील महिलांचे सुरक्षा धोक्यात आली आहे, असे ठाकरे गटाच्या महिला आघाडीने म्हटले आहे.
ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर वारांगनांचा वावर वाढल्याबाबत वारंवार रेल्वे आणि पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी आनंद सिनेमा येथे सह्यांची मोहीम राबविली. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी रेखाताई खोपकर, ज्योती कोळी, प्रमिला भांगे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते