स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून महापालिका प्रशासनाने आखलेल्या स्थानक परिसर वाहतूक सुधारणा (सॅटिस) प्रकल्पाला राज्य परिवहन महामंडळाने हिरवा कंदील दाखवण्याची तयारी केली आहे. महापालिकेने आखलेला सॅटिस प्रकल्प परिवहन महामंडळाच्या जागेतून जात असल्याने मूळ आराखडय़ात काही बदल करण्याच्या सूचना एसटी प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने या प्रकल्पाचा सुधारित आराखडा परिवहन महामंडळाला सादर केला असून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर पादचारी, दुचाकी, रिक्षा प्रवासी त्याचप्रमाणे चारचाकी आणि बस गाडय़ा अशी वाहतुकीची विभागणी करून बैलबाजार ते सुभाष चौक या भागात सॅटिस प्रकल्पाची आखणी महापालिका प्रशासनाने केली आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या जागेचा वापर करावा लागणार आहे. रेल्वेची ना हरकत मिळालेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य परिवहन महामंडळाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. एसटी महामंडळाच्या जागेतून हा प्रकल्प जात असल्याने या प्रकल्पाचे भवितव्य ना हरकत दाखल्यावर अवलंबून आहे. महापालिकेने यासंबंधी सुधारित प्रकल्प आराखडे सादर केल्याने राज्य परिवहन महामंडळाने यासाठी हिरवा कंदील दाखविण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रास्ताविक कल्याण मेट्रोला जोडल्या जाणाऱ्या या सॅटिसमुळे सध्या कोंडीत अडकलेल्या कल्याणकरांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

* ठाणे महानगरपालिकेतर्फे राज्य परिवहन महामंडळाच्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अनुषंगाने आराखडा तयार करून पाठवण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यानंतर प्रकल्पाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल,’ असे कल्याण-डोंबिवली पालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले.

अटीनुसार बदल

* सॅटिस प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेला आराखडा हा एसटी महामंडळाच्या बसगाडय़ांसाठी सोयीचा नसल्याने बसगाडय़ांच्या आकारानुसार या आराखडय़ात काही बदल करून या प्रकल्पास मंजुरी दिली जावी, असे महामंडळाचे म्हणणे होते. त्यामुळे आवश्यक बदल करुन महापालिकेने परिवहन महामंडळाकडे नवा आराखडा सादर केला आहे.

* या आराखडय़ास महामंडळाने तत्त्वत: संमती दिली असून भविष्यातील वाहतुकीसाठी अडथळा येणार नाही असा मध्यममार्ग काढण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

* महामंडळाने सुचविलेले पर्याय महापालिका प्रशासनाने मान्य केले आहेत. त्यामुळे ना हरकत दाखला देण्यास हरकत येणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Story img Loader