भगवान मंडलिक, लोकसत्ता
कल्याण : उतार वयात एकाकी जीवन जगणाऱ्या, घर नसलेल्या, कौटुंबिक जीवनापासून दूर असलेल्या, काही व्याधीग्रस्त चित्रपट, नाट्य क्षेत्रातील कलाकारांना आयुष्याच्या उतार वयात आनंदी जीवन जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने भिवंडी, शहापूर तालुक्यातील पडघा पिसे, खर्डी, बेळवड परिसरात महूसल विभागाच्या माध्यमातून जमीन शोधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
पावसाळी पूर परिस्थितीचा भाग, जलदगतीने प्रवास, मुंबईला वैद्यकीय किंवा अन्य कामासाठी सहज जाता येईल, अशा भौगोलिक परिस्थितीचा विचार करून या वृध्दाश्रमाची उभारणी करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले. मागील तीन वर्षाच्या कालावधीत चित्रपट, नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकारांचा उतार वयात एकाकी मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. काही कलाकार घर नसल्याने उपेक्षितांचे जीणे जगत असल्याचे उघडकीला आले होते. अशा कलाकारांच्या कलेची जाण ठेऊन त्यांना उतार वयात समाधानाने जीवन जगता यावे हा विचार करून राज्य शासन शहापूर, भिवंडी परिसरात कलाकारांसाठी वृध्दाश्रम उभारण्याच्या प्रयत्नात आहे.
आणखी वाचा-ठाणे: घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला शिक्षिकेकडून मारहाण
महाराष्ट्राच्या विविध भागातून कलाकार मुंबईत येऊन चित्रपट, नाट्य क्षेत्रात आपले जीवन घालवितात. ही वाटचाल सुरू असताना अनेक कलाकारांना स्वताचे हक्काचे घर घेणे जमत नाही. अशा कलाकारांची आयुष्याच्या उतार वयात परवडे होते. लहान घरात एकावेळी मोठे कुटुंब राहणे अशक्य होते. काही कुटुंब वृध्दापकाळात आपल्या कलाकार नातेवाईकाचा सांभाळ करण्यात टाळाटाळ करतात. हे कलाकार कुठेतरी एकाकी जीवन जगतात. कलाकारांची उतारवयातील ही परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने कलाकारांसाठी वृध्दाश्रम उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शहापूर, भिवंडी ही शहरे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला जोडलेली, आटगाव, खर्डी, आसनगाव ते टिटवाळापर्यंत रेल्वे स्थानकांनी जोडलेला भाग आहे. या भागात काळू, उल्हास, भातसा नद्या आहेत. पावसाळ्यात पूर परिस्थितीत वृध्दाश्रमाला पुराचा फटका बसू नये असा सर्वांगीण विचार करून वृध्दाश्रमाची उभारणी करण्याचा विचार शासन करत आहेत. महसूल अधिकारी यासाठी जागेची चाचपणी करत आहेत. उद्योग विभागानेही या कामासाठी पुढाकार घेतला आहे. प्रसंगी एखादा भूखंड विकत घेऊन तो वृध्दाश्रमासाठी मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी शासनाने केली आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीजवळील गोळवलीत बेकायदा बंगला भुईसपाट
जागा निश्चित झाल्यानंतर तो प्रस्ताव तालुका महसूल विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे दिला जाईल. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर योग्य निर्णय घेण्यात येणार आहे, असे महसूल विभागातील एका उच्चपदस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
खर्डी परिसरात कलाकारांसाठी वृध्दाश्रम बांधण्यासाठी शासन जमीन शोधत असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, यासंदर्भात लिखित स्वरुपात खर्डी महसूल मंडळ कार्यालयाकडे कोणताही प्रस्ताव आला नाही. -संदीप चौधरी, मंडळ अधिकारी, खर्डी, शहापूर.