ठाणे : भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचे इन्टाग्राम खाते हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांचे निकटवर्तीय विपूल म्हात्रे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. इन्टाग्राम खाते पुन्हा सुरळीत सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा यांच्या नावाने इन्टाग्राम खाते आहे. या इन्स्टाग्राम खात्यावर बाळ्या मामा यांच्या विविध भाषणे आणि कार्यक्रमांविषयी पोस्ट केल्या जातात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या इन्टाग्राम खात्याचे इ-मेल खाते आणि परवलीचे शब्द चुकीचे दाखविले जात होते. इन्टाग्राम सुरू होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विपूल म्हात्रे यांनी ठाणे पोलिसांकडे अर्ज केला होता. या अर्जानंतर हे प्रकरण नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झाले. अर्जाची दखल घेऊन याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात इन्टाग्राम हॅक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलसांनी दिली. बाळ्या मामा यांचे इन्टाग्राम खाते पुन्हा सुरळीत झाले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.