ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाक्यावर होणाऱ्या टोल वसूलीविरोधात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी संताप व्यक्त केला. बाळ्या मामा यांच्या कार्यकर्त्यांनी मागील तीन दिवसांत टोल नाक्यावरून होणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये आणि टोल वसूलीच्या आकडेवारीमध्ये तफावत आढळल्यास टोल प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच टोलनाक्यावर नियमांचे उल्लंघन होत असून दैनंदिन टोल वसूली बाबतची दिली जाणारी माहिती खोटी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबई नाशिक महामार्गावरून हजारो वाहने वाहतुक करतात. भिवंडीत गोदामे अधिक असल्याने उरण जेएनपीटी आणि गुजरातमधून येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतुक या मार्गावरून अधिक असते. येथील पडघा टोलनाका आहे. हा टोलनाका बंद व्हावा यासाठी येथील रहिवासी आणि राजकीय पक्षांनी अनेक आंदोलने केली होती. असे असले तरी हा टोलनाका सुरूच आहे. रविवारी रात्री बाळ्या मामा यांनी पडघा टोलनाक्यावर गेले. तसेच त्यांनी येथील टोल प्रशासनाला टोल वसूली बाबत जाब विचारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळ्या मामा यांनी टोल नाक्यावर नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप केला. टोलनाक्यावरील वाहतुक कोंडीत मी दोन ते तीन वेळा अडकलो होतो. तेव्हा याबाबत टोल प्रशासनाला नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु टोल प्रशासन कोणत्याही नियमांचे पालन करत नाही. या टोलवरून हलक्या वाहनांना सुट दिलेली नाही. टोलनाक्यामुळे गोदामाच्या माध्यमातून होणारा गावांचा विकास थांबला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असा आरोपही त्यांनी केला. टोल वसूली विषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या टोलनाक्यावर दररोज ३४ लाख रुपयांची टोल वसूली होत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु ही माहिती चूकीची आहे. आतापर्यंत टोल करारापेक्षाही अधिकची टोल वसूली येथून झाली आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी टोल नाक्यावरून होणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीची नोंद आमच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यानंतर आम्ही टोल वसूलीमधील तफावत दाखविणार आहोत. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर निष्काळजीपणा आढळल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.

Story img Loader