कल्याण : नागरिकांच्या धार्मिक विधी, घरगुती कार्यक्रमांना उपस्थिती ही लोकप्रतिनिधींची कार्यकर्ते, नागरिकांबरोबरीची नाळ जुळवून ठेवण्याची एक खास पध्दत आहे. याच नियमाने कल्याण लोकसभेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी दुपारी अंबरनाथ, डोंबिवली आणि शेवटी कल्याण असे करत आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेतले. कार्यकर्त्यांशी हितगुज केली. ही गणपती बाप्पा दर्शन भ्रमंती करत असताना सोमवारी पहाटे खा. शिंदे यांना भूक लागली. मग त्यांनी कल्याण मधील प्रसिध्द गरम चहा, मलई पाववर कार्यकर्त्यां सोबत भुकेच्या भरात ताव मारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून बाहेर पडल्यानंतर शिवसेेनेत गटातटाचे राजकारण तयार झाले. या गटतट यांना सांभाळण्यासाठी, आपल्या मर्जीत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खा. डाॅ. श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांच्या आग्रहावरुन त्यांचे घरगुती धार्मिक कार्यक्रम, उपक्रमांना भेटी देत आहेत. गणपती दर्शन कार्यक्रम हा कार्यकर्त्यांशी आपली नाळ घट्ट आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या सोबत आहेत हे दाखविण्याचा प्रत्येक लोकप्रतिनिधीचा प्रयत्न असतो.
हेही वाचा… कल्याणमध्ये खड्ड्यात दुचाकी आपटून टँकरखाली आल्याने चिरडून महिलेचा मृत्यू
अशाच पध्दतीने कल्याण लोकसभेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या व्यस्त वेळात रविवारी दुपारी अंबरनाथ येथून कार्यकर्त्यांच्या आग्रहावरुन गणपती दर्शनाला सुरुवात केली. अंबरनाथ, बदलापूर, तेथून डोंबिवली, शेवटी कल्याण असे करत सोमवारी पहाटेचे चार वाजले. प्रत्येक ठिकाणी प्रसाद, नैवद्य खाण्याचा आग्रह व्हायचा. असे केले तर गणपती दर्शन अर्धवट सोडावे लागेल. या विचाराने खासदारांनी फक्त दर्शन कार्यक्रमाला प्राधान्य दिले. सलग १४ तास भ्रमंती करुन खासदार शिंदे यांना कल्याण मध्ये सोमवारी पहाटे भूक लागली. यावेळी कल्याण मध्ये ते गणपती दर्शन घेत होते. बिर्ला महाविद्यालय चिकणघर परिसरात माजी नगरसेवक रवी पाटील यांच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर खासदार शिंदे यांना पहाटेची वेळ असली तरी पोटात ता काही तरी टाकले पाहिजे असा विचार करुन त्यांनी पहाटेच्या वेळेत हलके पण प्रसिध्द काय मिळते अशी विचारणा केली. त्यावेळी गरम चहा, मलई पाव पहाटेच्या वेळेत खाण्यास मजा येते, असे रवी पाटील यांनी खासदारांना सांगितले.
हेही वाचा… ठाणे : मुख्यमंत्र्याविरोधात बोललो नाही तर विरोधी पक्षनेतेपद पण हातून जाईल अशी दादांना भीती
तात्काळ चहा, गरम मलई पावची व्यवस्था करण्यात आली. खा. शिंदे यांच्यासह राजेश कदम, राजेश मोरे, रवी पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी खासदारांसोबत गरम गरम चहा, मलई पावचा आस्वाद घेतला. मस्त पोटभर खाऊन झाल्यानंतर ताजेतवाने वाटू लागल्यानंतर खासदारांनी ढेकर देत मुंबईतील वर्षा निवासस्थानी आपला प्रवास सुरू केला.
गणपती दर्शन घेताना कोण कुठला गटतट असा कोणताही विचार खासदारांनी केला नाही. वाटेत जे गणपती बाप्पा, कार्यकर्ते भेटले त्या प्रत्येकाच्या गणपती बाप्पा दर्शनाला खासदारांनी उपस्थिती लावली. दर्शन भेटीत त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही, असे राजेश कदम यांनी सांगितले.