विकासाच्या नावाने दारोदारी जाऊन एकदा मते मिळवली आणि संसदेत बाकावर जाऊन बसले की, नंतर तो विकास नागरिकांपर्यंत पोहोचलाय का, हे पाहण्यासाठी खासदारांना वेळ मिळत नाही, कटूसत्य आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘खासदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम सध्या थंडावला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात खासदार नागरिकांना भेटले होते, मात्र त्यानंतर दिल्लीत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याचा विसर पडला आहे.
राजकारणाचा फारसा अनुभव गाठीशी नसलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीची निवडणूक लढविली आणि मोठय़ा मताधिक्याने ते निवडूनही आले; परंतु शिंदे यांनी जनमानसात जाऊन राजकारणाचा अनुभव घेण्यास सुरुवात केली. रखडलेल्या विकासकामांविषयी चर्चा करून त्यांनी प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न केले.
तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी खासदार आपल्या भेटीला या उपक्रमाची सुरुवात केली. त्याअंतर्गत त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक शहराची निवड करीत त्यासाठी निश्चित वारही ठरवून दिले.
कल्याण-डोंबिवलीसाठी सोमवार, अंबरनाथसाठी मंगळवार, उल्हासनगरसाठी बुधवार, कल्याण ग्रामीण भागासाठी गुरुवार आणि कळवा मुंब्रा भागासाठी शनिवार निश्चित करण्यात आले. सुरुवातीचे दोन महिने हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात आला.
त्याअंतर्गत शहरातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काहींच्या वैयक्तिक समस्यांचीही त्यांनी दखल घेतली. दोन महिन्यांनंतर खासदार भेटीचा हा उपक्रम पूर्णपणे थंडावल्याचे चित्र आहे.

कार्यक्रम धडाक्यात
येत्या काही महिन्यांत अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवलीच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन शहरात केले जात आहे. या कार्यक्रमांना खासदार आवर्जून उपस्थित असतात. मात्र नागरिकांसाठी ते कधी वेळ काढणार असा प्रश्न शहरवासी विचारीत आहेत. दोन महिन्यांत जेव्हा खासदार नागरिकांना भेटले तेव्हा त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचीच गर्दी असल्याने अनेकांना त्यांना भेटता आले नाही. या संदर्भात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असला अधिवेशन तसेच मतदारसंघातील इतर कामांमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांच्या भेटीच्या वेळा पाळता येत नसल्याची कबुली त्यांनी दिली.

Story img Loader