विकासाच्या नावाने दारोदारी जाऊन एकदा मते मिळवली आणि संसदेत बाकावर जाऊन बसले की, नंतर तो विकास नागरिकांपर्यंत पोहोचलाय का, हे पाहण्यासाठी खासदारांना वेळ मिळत नाही, कटूसत्य आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘खासदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम सध्या थंडावला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात खासदार नागरिकांना भेटले होते, मात्र त्यानंतर दिल्लीत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याचा विसर पडला आहे.
राजकारणाचा फारसा अनुभव गाठीशी नसलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीची निवडणूक लढविली आणि मोठय़ा मताधिक्याने ते निवडूनही आले; परंतु शिंदे यांनी जनमानसात जाऊन राजकारणाचा अनुभव घेण्यास सुरुवात केली. रखडलेल्या विकासकामांविषयी चर्चा करून त्यांनी प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न केले.
तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी खासदार आपल्या भेटीला या उपक्रमाची सुरुवात केली. त्याअंतर्गत त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक शहराची निवड करीत त्यासाठी निश्चित वारही ठरवून दिले.
कल्याण-डोंबिवलीसाठी सोमवार, अंबरनाथसाठी मंगळवार, उल्हासनगरसाठी बुधवार, कल्याण ग्रामीण भागासाठी गुरुवार आणि कळवा मुंब्रा भागासाठी शनिवार निश्चित करण्यात आले. सुरुवातीचे दोन महिने हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात आला.
त्याअंतर्गत शहरातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काहींच्या वैयक्तिक समस्यांचीही त्यांनी दखल घेतली. दोन महिन्यांनंतर खासदार भेटीचा हा उपक्रम पूर्णपणे थंडावल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा