ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, याचा इन्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः केला आहे, असा दावा करत शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टिका केली. कालची भांग संजय राऊत यांची उतरलेली नाही, असे मी म्हणणार नाही कारण, रोजच संजय राऊत हे नशा करुन वक्तव्य करत असतात, अशी टिका म्हस्के यांनी केली.
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत, त्यांच्यासोबत शिंदे यांची दिल्लीत पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात आधी मला माहित आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कालची भांग संजय राऊत यांची उतरलेली नाही असे मी म्हणणार नाही. कारण, रोजच संजय राऊत नशा करुन वक्तव्य करत असतात, अशी टिका म्हस्के यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, याचा इन्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः केला आहे, असा दावाही त्यांनी केला.
जर तुम्हाला माहित होते की एकनाथ शिंदे हे कॉंग्रेस मध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवले, नगरविकास मंत्री का बनवले, म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का, असा प्रश्नही म्हस्के यांनी राऊत यांना विचाराला आहे. उद्धव ठाकरे घाबरत होते, शिंदे यांच्या खाद्यावरती जबाबदारी टाकुन तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत होतात.
जर ते कॉंग्रेसमध्ये जाणार होते तर, तुम्ही त्यांना घाबरत होतात. त्यांची लोकप्रियता पाहुन तुम्ही घाबरत होतात. त्यांची लोकप्रियता आहे हे तुम्ही मान्य केले होते, असेही म्हस्के म्हणाले. संजय राऊत हे ज्या झाडाला फळ लागतात, त्याच झाडाला लोक दगड मारतात. आता एकनाथ शिंदे यांच्याच मागे का सर्व पक्ष लागले आहेत की तुम्ही आमच्या सोबत या. कारण जनते मध्ये ते फार लोकप्रिय आहेत, असेही म्हस्के म्हणाले.