ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल सेतू आणि दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले जात आहे. या उद्घाटन कार्यक्रमाची पत्रिका राज्य शासनाने तयार केली असून त्या कार्यक्रम पत्रिकेतून ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे या उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतु, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि ऐरोली दरम्यान तयार करण्यात आलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. नवी मुंबई शहर ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत असून येथे ठाकरे गटाचे नेते राजन विचारे हे खासदार आहेत. दिघा गाव रेल्वे स्थानक तयार होऊन अनेक महिने उलटले होते. परंतु हे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी सुरू केले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच संसदेत हा प्रश्न उपस्थित केला होता. स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीमदेखील सुरू केली होती. आदित्य ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी दिघा गाव स्थानकाची पाहणी केली होती. तसेच केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. अखेर या स्थानकाचे लोकार्पण शुक्रवारी केले जाणार आहे. दिघा गाव स्थानकाची गुरुवारी रात्री राजन विचारे यांनी पाहणी केली होती. परंतु राज्य शासनाने तयार केलेल्या कार्यक्रम पत्रिकेतून विचारे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा – ठाण्यात तीनदिवसीय रामायण महोत्सव;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
कार्यक्रम पत्रिकेतील विशेष उपस्थितांची नावे
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे, अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, कपील पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, रविंद्र चव्हाण, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात दिघागाव रेल्वे स्थानक व बेलापूर ते पेंधर सुरू झालेली मेट्रो आहे. परंतु लोकप्रतिनिधीची नावे वगळून इतर नावे टाकण्याचा कळस या सरकारने केला आहे. दिघा गाव स्थानकासाठी प्रचंड मेहनत घेऊन पाठवपुरवा करून प्रकल्प कार्यान्वित केला. आता त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले गेले नसून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा यावर प्रश्न उपस्थित होत आहे. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या सरकारला २०२४ मध्ये आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनता यांची जागा दाखवून देईल. कार्यक्रम पत्रिकादेखील आज सकाळी १० वाजता पाठविण्यात आली. – राजन विचारे, खासदार.