कल्याण : कल्याण पूर्वमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याशी असलेल्या वितुष्टामुळे यंदा या भागातील विद्यमान खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे कमालीचे सावध झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आमदार गायकवाड यांनी पूर्व वैमनस्यातून खासदार शिंदे यांचे निकटचे सहकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. सध्या गणपत अटकेत असले तरी त्यांना मानणारा एक मोठा वर्ग या भागात आहे. या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू नये यासाठी खासदार शिंदे यांनी विकासकामे, निधी पेरणीचा धडाकाच या मतदारसंघात लावल्याचे पहायला मिळत असून आचारसंहितेपूर्वी हाती घेण्यात आलेल्या कामांचा जोरदार प्रचार शिंदे समर्थकांनी या भागात सुरु केला आहे.
कल्याण पूर्व भागातील सामान्य जनतेचे प्रश्न हाती घेत अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ या भागात कसा पोहोचविता येईल या दृष्टीने शिवसेनेने या भागात प्रयत्न सुरु केला आहे. आमदार गणपत गायकवाड यांचा कल्याण पूर्व भाग हा बालेकिल्ला आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले गायकवाड यापूर्वी या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येत. एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. मात्र खासदार शिंदे यांच्याशी त्यांचे सुरुवातीपासूनच जमेनासे झाले. मोफत केबल देत गणपत यांनी या भागात स्वत:चा वरचष्मा निर्माण केला. मात्र विकासकामांच्या आघाडीवर या भागात फारसे काही झाले नाही. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सर्वात बकाल मतदारसंघ म्हणून हा भाग ओळखला जातो. खासदार शिंदे यांनी या भागातील विकासकामांवर लक्ष केंद्रीत करताच त्यांचे आणि आमदार गायकवाड यांच्यात मतभेद निर्माण झाले. राज्याचे मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे येताच खासदार श्रीकांत यांनी या भागात महेश गायकवाड यांना ताकद देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा वाद चिघळला आणि पुढे गोळीबाराचे प्रकरण घडले.
हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका
खासदार सतर्क
कळवा-मुंब्रा, कल्याण ग्रामीण हे डाॅ. जितेंद्र आव्हाड, प्रमोद उर्फ राजू पाटील यांचे मतदारसंघ शिवसेनेला साथ देणार नाहीत. कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदेच, असे डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण कितीही म्हणत असले तरी मागील तीन वर्षाच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण तीव्र नाराज आहेत. उल्हासनगर चव्हाण यांच्या इशाऱ्यावर चालणारा मतदारसंघ आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या शहरांमधील तथाकथीत नेत्यांची एक मोठी फळी खासदार शिंदे यांच्यावर नाराज आहे. ते विकासकामे करताना कुणाला विश्वासात घेत नाहीत असे या नेत्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे विरोधकांच्या वादाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कल्याण पूर्व मतदारसंघात खासदारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
लोकाभिमुख कार्यक्रम
कल्याण पूर्व भागातील अनेक वर्ष रखडलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्याचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अनावरण करण्यात आले. या स्मारकासाठी यापूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले होते. स्वताच्या आमदार निधीतील रक्कम या स्मारकासाठी उपलब्ध करून दिली होती. आता या स्मारकाच्या उभारणीत खासदार शिंदे यांनी एकूण २१ कोटी या स्मारकासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. खासदार शिंदे यांच्या आदेशानुसार महेश गायकवाड पायाला भिंगरी लावून कल्याण पूर्व भागात काम करत आहेत.
हेही वाचा – राणांसमोर घटक पक्षांची एकजूट राखण्याचे आव्हान
गोळीबारामुळे कल्याण पूर्वेत उघड वितुष्ट आले आहे. लोकांचे हित पाहून शिवसेना कार्यक्रम करत असते. ते कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये वेगळ्या भागात होतात. मध्यवर्ती ठिकाण म्हणून शिलाई, घरघंटी वाटप कार्यक्रम कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे घेण्यात येत आहे. हा कार्यक्रम पालिकेचा आहे. – गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.