डोंबिवली : राज्यात लोकसभेसाठी जेथे शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत तेथे शिवसेनेचाच उमेदवार असेल, हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनावश्यक चर्चाना कोणी धुमारे फोडू नयेत, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथे सांगितले.
पक्ष-संघटना मजबुती आणि लोकसभा मतदारसंघनिहाय केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांवर राज्यातील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. या मतदारसंघातील पक्षाची पकड, विकासकामे याचा आढावा घेण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री मतदारसंघात फिरतात. म्हणून ते प्रत्येक मतदारसंघावर दावा करतात असे नाही, असे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
मागील आठवडय़ापासून कल्याण लोकसभेसाठी शिवसेना-भाजपकडून काही चेहरे पुढे आणले जात आहेत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात डोंबिवलीतील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दबावातून विनयभंगाचा गुन्हा पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन दाखल केल्याची टीका भाजपमधून केली जात असल्याने भाजपमध्ये खासदार शिंदे यांच्या अशा डिवचणाऱ्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खा. शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून कल्याण लोकसभेवर आपलाच दावा असणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
डोंबिवलीतील पाटीदार भवनमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यात लोकसभा मिशन-४५ सुरू आहे. केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशाप्रमाणे भाजपचे केंद्रीय मंत्री भाजप, शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये जाऊन तेथील विकासकामे, पक्ष-संघटना आढावा यांची माहिती घेत आहेत. आपल्या मतदारसंघावर भाजप दावा करतेय, असे कोण म्हणतेय त्यांचे नाव तर घ्या, असा प्रश्न शिंदे यांनी केला.