बदलापूरः गेल्या काही महिन्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार कपिल पाटील आणि शिवसेना शहप्रमुख वामन म्हात्रे यांच्या शाब्दीक चकमक सुरू असल्या तरी पालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एकमेकांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. येत्या पालिका निवडणुकीत युतीचीच सत्ता येणार असे सांगत युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचे स्पष्ट संकेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे ही युती आता शिवसेना भाजप पुरता मर्यादित राहते की त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचाही समावेश होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा >>> ठाणे : तलाठी भरती परिक्षेसाठी केंद्रांच्या आवारात मनाई आदेश
शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी आगामी पालिका निवडणुकांमध्ये युतीचीच सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केला. कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर अनेक वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्या माध्यमातून वामन म्हात्रे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहराला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. यापुढेही दर्जेदार सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध केला जाईल, असे डॉ. शिंदे यावेळी म्हणाले.
हेही वाचा >>> ठाण्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘पेट परेड’
आपण युतीच्या माध्यमातून पालिकेवर सत्ता स्थापन करू असेही यावेळी डॉ. शिंदे म्हणाले. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युती होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्यात शाब्दिक चकमकी घडल्या होत्या. तसेच बदलापूर शहरात भाजपच शिवसेनेचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष राहिला आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वर्चस्वावरून चढाओढ असते. अशा स्थितीत खासदार डॉ. शिंदे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधान आले आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कसे जुळवून घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यात गेल्या महिन्यात अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस गट युती सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही युतीमध्ये सहभागी होणार का असाही प्रश्न आता निर्माण होतो आहे.
हेही वाचा >>> यंदा ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष टळला; दोन्ही गटांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या जागा बदलल्या…
महापालिकेच्या धर्तीवर प्रशासकीय इमारत कुळगाव बदलापूर नगरपालिकेची इमारत महापालिकेच्या धर्तीवर उभारण्यात आली असून जिल्ह्यात सर्वात मोठी इमारत असल्याचे यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यांनी शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या समवेत या इमारतीची पाहणी केली. तसेच वर्षा मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना त्यांनी पुरस्कारही प्रदान केले.