कल्याण: ‘नाथ’ घरी आहेत म्हणून ही यांची मुजोरी. शासकीय यंत्रणांनी निधी दिला म्हणून करोडोच्या फक्त बाता करता, अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. कल्याण लोकसभेची निवडणूक लढविण्यापूर्वी नावापुढे आजी शब्दा ऐवजी माजी शब्द लागणार नाही ना, असा उपरोधिक सल्ला शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना मंगळवारी दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यावर प्रतिउत्तर देत आमदार पाटील यांनी खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. मागील सात ते आठ महिन्यांपासून खासदार शिंदे आणि आमदार पाटील यांच्यामधील पत्र, फलकबाजी, ट्विटर युध्द थंडावले होते. त्यामुळे या दोघांचे मनोमिलन झाल्याची चर्चा सुरू होती. परंतु, खासदार शिंदे यांनी मंगळवारी डोंबिवली जवळील खोणी-शिरढोण गावाजवळील म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांच्या कार्यक्रमात आमदार पाटील या्ंच्या कार्यपध्दतीचा समाचार घेतल्याने आमदार पाटील यांनी शिंदे यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

हेही वाचा >>> “कल्याण लोकसभा लढविताना नावापुढं…”, श्रीकांत शिंदेंचा राजू पाटलांना टोला

घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत म्हणून ही सगळी खासदारांची मुजोरी आहे. वडिलांनी आपल्या वजनाने एमएमआरडीए, एमएसआरडीसीकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी दिला म्हणून खासदार शिंदे करोडोंच्या बाता करतात. कामाने उत्तर दिले असते तर या मतदारसंघात नागरी समस्या राहिल्या नसत्या. मीच कल्याण लोकसभेचा खासदार असेन हे सांगण्याची वेळ खासदारांवर आली नसती. त्यातच मोठी मेख आहे, अशी टीका पाटील यांनी केली. रेल्वे प्रवाशांना दररोज मरण यातना सहन करुन का प्रवास करावा लागतो. डोंबिवलीतील काँक्रीट रस्ते पाहून हे रस्ते शेणाने सासारवलेले आहेत की काय, असा प्रश्न पडतो, अशी टीका आमदार पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: “…मग हे सरकार खूनी नाही तर काय आहे?” ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांचा परखड सवाल!

राजू पाटील यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिला तर आपण कल्याण लोकसभेची निवडणूक लढू शकतो, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना खासदार शिंदे यांनी या भागातील काहींना लोकसभेची स्वप्ने पडू लागली आहेत. स्वप्ने प्रत्येकाला पडलीच पाहिजेत. स्वप्ने पाहण्यापूर्वी आपले काम, कर्तृत्व काय आहे हे पण एकदा तपासून पाहण्याची गरज आहे. लोक उगाच मतदान करत नाहीत. मागील पाच वर्षात कोणती विकासाची कामे केली हे त्यांनी एकदा तपासून पहावे आणि मग लोकसभा उमेदवारीची स्वप्ने पहावीत. अन्यथा, आपल्या नावापुढचा आजी शब्द जाऊन माजी शब्द लागण्याची अधिक भीती आहे, अशी टिपण्णी खासदार शिंदे यांनी आमदार पाटील यांचे नाव न घेता केली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp shrikant shinde the funds of chief minister father eknath shinde criticism raju patil ysh
Show comments