रेल्वे अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी मंगळवारी मुंबई आणि ठाण्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पापूर्वीच्या या बैठकीला विशेष महत्त्व असतानाही ठाणे आणि कल्याणच्या खासदारांनी बैठकीला अनुपस्थित राहून रेल्वे प्रवाशांकडेच पाठ फिरवल्याची टीका प्रवाशांकडून केली जाऊ लागली आहे.
लोकलच्या कमी फेऱ्या, वाढणारी गर्दी, तांत्रिक कारणामुळे वारंवार ठप्प होणारी लोकल सेवा, स्थानकांवरील समस्या आणि असुरक्षितता अशा अनेक समस्यांनी रेल्वे प्रवासी त्रस्त झाले आहेत. आगामी रेल्वे अर्थसंकल्पाकडून प्रवाशांच्या मोठय़ा अपेक्षा असून या समस्यांवर योग्य तोडगा मिळण्यासाठी प्रवासी प्रयत्न करत आहेत. रेल्वे अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर सुद यांनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन तेथील स्थानिक खासदारांच्या भेटी घेतल्या. नागपूर, पुणे, सोलापूर या भागातील खासदारांच्या भेटीनंतर मंगळवारी त्यांनी मुंबई, ठाण्यातील खासदारांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस  मुंबईतील खासदार उपस्थित असले तरी ठाणे आणि कल्याणच्या खासदारांची मात्र अनुपस्थिती होती.
मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाणेपलिकडच्या स्थानकांमध्ये सर्वाधिक प्रवासी संख्या असून याच भागामध्ये रेल्वेच्या अनेक तक्रारी आहेत. पूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये या भागातील नागरिकांसाठी देण्यात आलेल्या घोषणांची अद्याप पूर्तता झाली नसल्याने या भागातील परिस्थिती अधिक आग्रहीपणे मांडण्याची गरज आहे, असा सूर प्रवासी संघटनांकडून लावला जात आहे.
ऐनवेळी निमंत्रणामुळे पोहोचणे अशक्य
मध्य रेल्वेच्या वतीने सोमवारी म्हणजे केवळ २४ तास अगोदर महाव्यवस्थापकांच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले. मात्र रेल्वेसंदर्भातीलच अन्य बैठक दिल्लीमध्ये असल्याने तिथेही उपस्थित राहणे गरजेचे होते. रेल्वेचे निमंत्रण वेळेत पोहचले असते तर या बैठकीस नक्कीच उपस्थित राहता आले असते. मात्र अचानक बैठक ठरल्याने मुंबईतील बैठकीला पोहचणे अश्यक्य होते. रेल्वे प्रश्नावर माझ्याकडून सततचा पाठपुरावा सुरू आहे. महाव्यवस्थापकांच्या बैठकीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने वेळीच माहिती दिली असती तर बैठकीत हजर राहत आले असते, अशी प्रतिक्रिया कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली तर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader