बटाटा खायला कोणाला आवडत नाही. सर्वसामान्य माणसाचे ते खाणे आहेच, शिवाय लहान मुले आणि तरुणांनाही बटाटय़ाच्या पदार्थाचे विशेष आकर्षण. बटाटावडा, बटाटय़ाची भजी, बटाटा वेफर्स आणि अलीकडच्या काळात मिळणारे फिंगर चिप्सवर तर उडय़ाच पडत असतात. मीरा रोडच्या स्लश या फ्रूट ज्युस बारमध्ये आता मी. फ्राइज या ब्रॅण्ड नावाने फिंगर चिप्सचे तब्बल २२ ते २३ प्रकार उपलब्ध आहेत.
बर्गरसोबत फिंगर चिप्स खाण्याची पद्धत आहे. तरुणाईची ही आवड ओळखून स्लशचे सूरज भालसिंग यांनी आपल्या आऊटलेटमध्ये मी. फ्राइज हा ब्रॅण्ड आणला आहे. बटाटय़ाच्या फिंगर चिप्सना वेगवेगळ्या प्रकारचे स्वाद देऊन त्यांना आकर्षक स्वरूपातले फिंगर चिप्स याठिकाणी मिळतात.
रेग्युलर फ्राइज म्हणजे नेहमी मिळणाऱ्या फिंगर चिप्स व्यतिरिक्त पोटॅटो चीझ शॉट्स हा फिंगर चिप्सचा वेगळा प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहे. फिंगर चिप्समध्ये चीज घालून ते तेलात डीप फ्राय केले जातात. चीजच्या चवीमुळे या फिंगर चिप्सना एक वेगळ्याच प्रकारची चव मिळते. व्हेजी स्टिक्स हा आणखी एक वेगळा प्रकार. विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बटाटा घालण्याची पद्धत आहेच. हीच पद्धत व्हेजी स्टिक्समध्ये उपयोगात आणली आहे. हिरवे वाटाणे, गाजर आणखी एक दोन भाज्या आणि बटाटा एकत्र स्मॅश केले जाते आणि त्याच्या स्टिक्स तयार करून त्या डीप फ्राय केल्या जातात. त्यामुळे भाज्या खाण्याचे एक समाधानही यात मिळते.
चीज तर सर्वानाच मनापासून खायला आवडत असते. तरुणाईला चीजचे असलेले प्रचंड आकर्षण लक्षात घेऊन चीज व्होल्कॅनो फ्राइज तयार करण्यात आला आहे. व्होल्कॅनो या नावातच उद्रेक असल्याने भरपूर चीज घालून बनवलेले फ्राइज असणार हे वेगळे सांगायला नकोच. चीजची आवड असणाऱ्यांसाठी खास फिंगर चीप्सवर चीजचे टॉपिंग्ज घातले जाते. भरपूर कॅलरीजची आवश्यकता असणाऱ्यांनी चीज व्होल्कॅनो फ्राइज खायला हरकत नाही.
चॉकलेट आणि लहान मुलांचे अतूट नाते आहे. मुलांमध्ये चॉकलेटची असलेली आवड चॉकलेट ओवरलोडेड फ्राइज यात उपयोगात आणण्यात आली आहे. फिंगर चिप्सवर चॉकलेटचे कोटिंग, चॉकलेट सिरप तसेच चॉकलेटचे तुकडे याचा सढळ हस्ताने वापर करण्यात आला आहे. मुलांची फिंगर चिप्स आणि चॉकलेट या दोघांची आवड यात जपली गेली आहे. बर्गरसुद्धा तरुणांमध्ये प्रिय आहेतच. यासाठी डबल डेकर हा बटाटय़ाचा वापर असलेला बर्गर या ठिकाणी मिळतो. बर्गरच्या पहिल्या थरात बटाटय़ाची टिक्की ठेवली जाते आणि दुसऱ्या थरात वेगवेगळ्या भाज्या आणि लेटय़ुसची पाने वापरली जातात. इटालियन आणि थाई पदार्थाची चव देणारा थाय मिंट करी, अलेपिनो तसेच खास लिंबाच्या लोणच्याची चव देणारा लेमन पिकल, पापडी चाच असे विविध प्रकारचे फ्राइज या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक पदार्थ वापरण्यात येतात. मी. फ्राइजच्या आता भाईंदर पश्चिम, विरार येथेही शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
- पत्ता – मी. फ्राइज, स्लश, शॉप क्र. ७, ओसवाल किरण, मीरा-भाईंदर रोड, जुन्या पेट्रोल पंपासमोर, मीरा रोड (पूर्व)
- वेळ – दुपारी १.३० ते रात्री १२.