लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या काळात उभारण्यात आलेल्या चार बेकायदा बांधकामांच्या बांधकामधारकांवर महाराष्ट्र नियोजन आणि नगररचना कायद्याने (एमआरटीपी) फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे पोलिसांचा चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
गेल्या आठ महिन्याच्या काळात ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी (नुकतीच मुख्यालयात बदली) डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा, नवापाडा, गरीबापाडा, कोपर, मोठागाव, देवीचापाडा भागातील एकूण २६ भूमाफियांविरुध्द बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणी एमआरटीपीचे गुन्हे विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत.
हेही वाचा… ठाण्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘पेट परेड’
यामधील बहुतांशी इमारतींचे बांधकाम ह प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे. अक्षय गुडधे यांच्या काळात सुरू झाले होते. रोकडे यांनी बांधकामधारकांना नोटिसा देण्या व्यतिरिक्त या बांधकामांवर तोडकामाची कारवाई केली नाही, असे अधिकारी सांगतात. अशा सर्व बेकायदा इमारतींचा सर्व्हे करुन साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी माफियांच्या विरुध्द एमआरटीपीचे गु्न्हे दाखल केले. गेल्या आठवड्यात चार भूमाफियांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले.
हेही वाचा… डोंबिवली, कल्याणमध्ये वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहन मालक हैराण
गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये देवीचापाडा येथील काळुबाई मंदिरा जवळ जितू म्हात्रे, मुकेश म्हात्रे या भूमाफियांनी १५ मीटरचा पालिकेचा विकास आराखड्यातील रस्ता बाधित होईल अशा पध्दतीने सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी या माफियांना नोटिसा बजावून आवश्यक बांधकाम परवानग्या, जमीन मालकीची कागदपत्रे दाखल करण्याची मागणी केली होती. जितू, मुकेश सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. पालिकेला न जुमानता जितू, मुकेश म्हात्रे यांनी सात माळ्याची बेकायदा इमारत पालिकेच्या रस्त्याला अडथळा होईल अशा पध्दतीने बांधली आहे. ही इमारत अनधिकृत घोषित असल्याने साहाय्यक आयुक्त गुप्ते यांनी बांधकामधारक जितू म्हात्रे विरुध्द एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला.
जुनी डोंबिवलीतील राम मंदिराजवळ भरत हरिश्चंद्र म्हात्रे या माफियाने बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. तत्कालीन साहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी म्हात्रे यांना नोटीस बजावून बांधकामाची कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पालिकेच्या आदेशाला न जुमानत म्हात्रे यांनी सहा माळ्याची इमारत बांधून पूर्ण केली. त्यांच्या विरुध्द एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेतीबंदर क्राॅस रस्ता येथील दत्तप्रसाद कृपा सोसायटीच्या बाजुला राकेश गुप्ता या भूमाफियाने पाच माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी गुप्ता यांना बांधकामाची कागदपत्रे दाखल करण्याची नोटीस बजावली होती. दरम्यानच्या काळात गुप्ता यांनी पाच माळ्याचे बांधकाम पूर्ण केले. गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. देवीचापाडा येथील शंकर म्हात्रे यांनी सात माळ्याचे बेकायदा बांधकाम केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या भूमाफियांवर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.