ग्राहकांमध्ये ऊर्जा बचत व संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी महावितरण कल्याण पश्चिम विभागातर्फे शुक्रवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीत महावितरणचा अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता.

पारंपरिक ऊर्जेचे स्रोत विरळ होत असल्यामुळे जगाला ऊर्जेची समस्या भेडसावत आहे. ऊर्जेची बचत व योग्य वापर याद्वारे आपण ऊर्जेच्या प्रश्नाला योग्य प्रकारे सोडवू शकतो, म्हणून प्रत्येक नागरिकाने ऊर्जेची बचत करण्यास स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे, ऊर्जा बचतीचा ध्यास घेतला पाहिजे, असे संदेश या फेरीच्या माध्यमातून देण्यात आल्याचे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता श्रीकांत जलतारे यांनी सांगितले.

या प्रभात फेरीची सुरुवात महावितरणच्या तेजश्री या कार्यालयापासून झाली. तेथून ती कर्णिक रोड, सहजानंद चौक, शिवाजी चौक, मोहम्मद अली रोड, मुरबाड रोड मार्गे सिंडिकेट चौक येथून पुन्हा तेजश्री कार्यालय येथे समाप्त झाली. या वेळी कल्याण परिमंडळ पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, वादिराज जहांगीरदार, सुभाष बनसोड, परदेशी, राठोड, सिद्धार्थ तायवाडे, दिलीप मेहेत्रे, दीपक लहांमगे यांसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.