चुकीच्या वीज बिलातील दुरुस्तीसाठी नागरिकांच्या कार्यालयासमोर रांगा

महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सतत वाढून येणाऱ्या वीज बिलामुळे त्याबाबत तक्रार, दरुस्ती करण्यासाठी दर महिन्यालाच महावितरणचे वसई कार्यालय गाठण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विरारमधील नागरिकांना वीज बिल हे दुप्पट रकमेने वाढवून मिळत आहे. ७०० ते ८०० रुपये बिल येणाऱ्या नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून दोन ते अडीच हजार रुपये बिल येत आहे. नागरिकांनी याबद्दल तक्रार केल्यास येथील कर्मचाऱ्यांकडून थातुरमातुर उत्तरे देण्यात येतात, त्यामुळे नागरिकांना महावितरण कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. ज्या नागरिकांचे उत्पन्न हे रोजच्या कमाईवर अवलंबून असते जसे रिक्षाचालक असो किंवा मजदूर कामे सोडून महावितरण कार्यालयात बसून राहावे लागते. एखाद्या महिन्याला जर बिल वाढवून आले असेल तर दुसऱ्या महिन्यात शून्य रकमेचे बिल येते. विचारपूस करायला गेल्यास नागरिकांना व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याने नागरिकांच्या शंकेचे निरसन होत नाही. नागरिकांना हा त्रास गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सहन करावा लागत आहे.

वीज बिल वेळेवर भरले नाही तर नागरिकांवर कारवाई केली जाते. पण मात्र महावितरणचा हा भोंगळ कारभार सुरू असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

‘मीटरमध्ये बिघाड असल्यामुळे ही समस्या वाढलेली आहे. गेल्या चार महिन्यांपासून मिटरमध्ये बिघाड असल्यामुळे ते चुकीची रेटिंग दाखवत आहे. येत्या एक महिन्यात नवीन चांगले मीटर बसवले जातील. मुख्य कार्यालयातून नवीन मीटर बसवण्याकरिता परवानगी मिळाली आहे. एक महिन्यात सर्व काम पूर्ण होईल. मग नागरिकांना हा त्रास होणार नाही.’

-सूर्यकांत महाजन, वरिष्ठ अभियंता, महावितरण

वसईतील सर्व भागांमधून चुकीचे वीज बिल दिले जात असल्याची नागरिकांची तक्रार असून कामांचा दिवस लोकांना  बिलात दुरुस्ती करुन घेण्यासाठी खर्च करावा लागत आहे.