६८ लाख रुपयांचा कर थकविल्यामुळे महापालिकेची कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर वसुलीसाठी प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. सोमवारी महानगर टेलिफोन निगमच्या मालमत्तेवर प्रशासनाने वॉरंट आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. एमटीएनएलने मोबाइल टॉवरच्या जागेचा ६८ लाख रुपयांचा कर थकविला होता. अशाच प्रकारे अन्य थकबाकीदारांवरही महापालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मालमत्ता कर थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. या थकबाकीदारांना नोटिसा बजावून कराची रक्कम भरण्यास सांगितले जात आहे. नोटिसांना केराची टोपली दाखविणाऱ्या थकबाकीदारांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. काही महिन्यांपूर्वी नौपाडय़ातील एका खासगी मोबाइल कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. त्यापाठोपाठ सोमवारी ठाण्यातील चरई भागात एमटीएनएलच्या इमारतीवर वॉरंट आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. एमटीएनएलच्या गरुडा आणि डॉल्फिन या कंपनीने महापालिका क्षेत्रात मोबाइल टॉवर उभारले असून त्याचा ६८ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. त्याच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून त्यामुळे शहरातील कर थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, ज्यांनी मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नाही, त्यांनी वॉरंट, जप्ती आणि लिलावाद्वारे मालमत्ता विक्रीची कारवाई टाळण्यासाठी तात्काळ कर भरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

कर भरण्याचे आवाहन

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली व्हावी आणि नागरिकांना कर भरणे सोईचे व्हावे यासाठी प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ मार्च २०१९ पर्यंत महापालिकेची सर्व मालमत्ता कर संकलन केंद्रे २१ मार्च २०१९ वगळता इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पूर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत सुरू राहणार आहेत. महापालिकेच्या  http://www.thanecity.gov.in या या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने तसेच Digithane द्वारेही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.